नाशिक : वेतनवाढीसह प्रलंबित मागण्यांसाठी सिटीलिंक चालकांनी शनिवारी (दि. २७) पुकारलेल्या संपावर रविवारी (दि.२८) रात्री उशिरापर्यंत बैठकांचा सिलसिला सुरू होता. दिवसभरात दोन बैठका पार पडल्यानंतर रात्री १० वाजता देखील चालक आणि व्यवस्थापनात बैठक पार पडली. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा या बैठकीत सकारात्मक चर्चा घडून आली.
महापालिकेने सिटीलिंक कनेक्टिंग नाशिकच्या माध्यमातून ८ जुलै २०२१ पासून ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट तत्त्वावर शहर बससेवा सुरू केली. खासगी ऑपरेटर्सच्या माध्यमातून सद्यस्थितीत शहरात २५० बसेस चालविल्या जातात. ऑपरेटर्सकडून चालकांना नाममात्र वेतन दिले जात असल्यामुळे त्यांना उपासमार सहन करावी लागत आहे. त्यामुळे वेतनवाढीसह प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली बस चालकांनी शनिवारी (दि.२७) संपाचे हत्यार उपसले. मुळ वेतनात १२ हजाराांची वाढ करण्यासह प्रोत्साहन भत्ता वाढवून मिळण्याची बसचालकांची मागणी आहे. प्रतिकिलोमीटर दोन रुपये प्रोत्साहन भत्ता मिळावा, तसेच तपोवन डेपो व नाशिकरोड बसचालकांचे मुळ वेतन समान करावे, अशी चालकांची मागणी आहे.
दरम्यान, चालकांच्या या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सिटीलिंक प्रशासनाने दिवसभर बैठकांचे सत्र पार पाडले. संप मागे घेतल्यानंतरच मागण्यांचा विचार केला जाईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतल्यानंतर त्यास संपकरी चालकांनी देखील प्रतिसाद दिल्याची माहिती प्रशासनाने सांगितली.
आम्ही शांततेच्या भूमिकेत असून, प्रशासनाने गोरगरिब चालकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा. आम्ही प्रशासनाला पाठीवर मारा पोटावर मारू नका, असे स्पष्ट सांगितले आहे. मागण्या मार्गी लागतील, असा विश्वास आहे.अंकुश पवार, नेते, मनसे कामगार संघटना, नाशिक.
चालकांनी संप पुकारल्यानंतर शनिवार आणि रविवारी एकही बस रस्त्यावर धावली नाही. त्यामुळे प्रवाशांचे काही प्रमाणात हाल झाले. सुदैवाने संपाच्या दोन्ही दिवशी शासकीय सुट्टी असल्याने, विद्यार्थी आणि चाकरमान्यांना संपाचा फटका सोसावा लागला नाही. मात्र, अन्य प्रवाशांचे दोन्ही दिवस हाल झाल्याचे दिसून आले.
रात्री उशिरापर्यंत घेण्यात आलेल्या बैठकांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. अगोदर संप मागे घ्या, नंतरच मांगण्यावर बोला अशी भूमिका आम्ही घेतली असून, चालकांना देखील ती मान्य आहे. त्यामुळे संप मिटेल अशी अपेक्षा आहे.मिलिंद बंड, महाव्यवस्थापक, सिटीलिंक, नाशिक.