नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपच्या विजयाचा अश्व रोखण्यासाठी महाविकास आघाडीत वंचित, रासपलाही सोबत घेण्याची तयारी मनसेने केली आहे. छोट्या पक्षांची मोट बांधून महापालिकेच्या सत्तेपर्यंत पोहोचण्याची व्यूव्हरचना आघाडीतर्फे आखली जात असून मनसेच्या या प्रयत्नांना कितपत यश मिळते हे आता येणारा काळच ठरवणार आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे. महापालिकेसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होत आहे. यासाठी मंगळवार(दि.२३)पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. महापालिकेत १०० प्लसचा नारा देणाऱ्या भाजपची शिवसेना(शिंदे गटा)सोबत युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. जागा वाटपावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बोलणी सुरू आहे. महापालिकेवर पुन्हा भगवा फडकविण्याचा निर्धार भाजपने केला आहे.
शिंदे गटाकडूनही प्रतिसाद दिला जात आहे. शनिवारी(दि.२०) सायंकाळी उशिरा भाजप, शिंदे गटाच्या नेत्यांची संयुक्त बैठकही पार पडली. दुसरीकडे महाविकास आघाडीची तयारी सुरू झाली आहे. शिवसेना(उबाठा), मनसेसह राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाची आघाडी निश्चित मानली जात आहे. मुंबईत काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली असली तरी नाशिकमध्ये काँग्रेसला सोबत घेण्यासाठी मनसेने स्वत: एक पाऊल पुढे टाकले आहे. महाविकास सर्वच जण समान असल्याचे सांगत कुणीही मोठा अथवा छोटा भाऊ नसल्याचा दावा मनसे नेत्यांकडून केला जात आहे. इतकेच नव्हे तर भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीत वंचित, रासपला देखील सोबत घेण्याची तयारी केली जात आहे. मनसेच्या नेत्यांची संबंधित पक्षांच्या स्थानिक नेत्यांसमवेत बोलणी सुरू असून यात यश येईल, असा दावा मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी केला आहे.
मनसेतर्फे इच्छूकांच्या मुलाखतींना जोर
मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, रतनकुमार इचम, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, महिला सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे आदी नेत्यांच्या उपस्थितीत शनिवारी(दि.२०) मनसे मध्यवर्ती कार्यालय 'राजगड' येथे इच्छूकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पार पडली. मनसेकडे तब्बल २८६ इच्छूकांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले होते. प्रभागातील एकूण लोकसंख्या किती, मतदार किती, पुरूष-महिला मतदारांची संख्या किती, तरुण मतदार किती आहेत, मतदान केंद्रांची संख्या, कोणत्या भागात मतदानाचा टक्का अधिक असतो, प्रभागातील सामाजिक परिस्थिती, जातीनिहाय मतदानाची टक्केवारी, निवडणुकीसाठी किती खर्च करणार, बुथ कार्यकर्ते उपलब्ध आहेत का, विजयासाठी बलस्थाने कोणती, आदी प्रश्नांची सरबत्ती इच्छूकांना नेत्यांकडून करण्यात आली. या मुलाखतीचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे सादर केला जाणार आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या निर्णयानंतर उमेदवारी जाहीर केली जाईल, अशी माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांनी दिली.
उध्दव-राज संयुक्त सभेची तयारी
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त जाहीर सभा घेण्याचे नियोजन केले जात आहे. ८, ९ व १० जानेवारी या तारखांचा यासाठी विचार केला जात आहे. यासह मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज ठाकरे तसेच मनसेचे अन्य वरिष्ठ नेतेही नाशकात प्रचार सभा घेतील, असे दिनकर पाटील यांनी सांगितले.