K.V.N Naiks
व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा झाली आहे.  File Photo
नाशिक

Nashik News|व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रणी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेत संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. २७ जुलै रोजी मतदान तर, २८ तारखेला मतमोजणी पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक मंडळाचे अध्यक्ष ॲड. जालिंदर ताडगे यांनी दिली.

क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे नव्याने कार्यकारी मंडळ निवडीसाठी निवडणूक मंडळाचे अध्यक्ष ताडगे, सदस्य ॲड. संतोष दरगोडे व एल. एम. ढाकणे यांनी कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार २ जुलै रोजी सकाळी ११ ला मतदारांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात येईल. यादीच्या प्रसिद्धीपासून ते ५ तारखेपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४ यावेळेत यादीवर हरकती स्वीकारल्या जातील. तर ५ जुलैला सायंकाळी ५ ला मतदारांची अंतिम यादीची प्रसिद्धी होईल.

निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना ६ ते ९ जुलै या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत अर्ज देणे व स्वीकृती करण्यात येईल. दाखल अर्जांची छाननी १० तारखेला दुपारी ३ वाजता पार पडणार असून, त्यानंतर पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज माघारीसाठी १३ जुलै रोजी दुपारी ४ पर्यंत मुदत असणार आहे. माघारीनंतर लगेचच सायंकाळी ६ वाजता रिंगणातील अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्धी व निशाणी वाटप पार पडणार आहे. तसेच २७ जुलैला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान घेण्यात येणार असून, २८ जुलैला सकाळी ८ पासून मतमोजणीला प्रारंभ होईल, असे ताडगे यांनी सांगितले.

कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे

नाईक शिक्षण संस्थेत २९ संचालकांचे कार्यकारी मंडळ निवडले जाते. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस व चिटणीस या पदांसह सहा विश्वस्त, तालुकानिहाय १९ संचालकांचा समावेश आहे. नाशिक शहर, तालुका व इगतपुरीतून चार संचालक, सिन्नर तीन, निफाड व चांदवड तीन, येवला व मालेगाव दाेन, नांदगाव, बागलाण व कळवणमधून दोन, दिंडोरी, पेठ व सुरगाण्यातून तीन, दोन महिला प्रतिनिधी असे संचालक निवडण्यात येते.

SCROLL FOR NEXT