आर.बी.जी. फाऊंडेशनचा शैक्षणिक उपक्रम; ५०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप 
नाशिक

Nashik News | 'उत्सव शिक्षणाचा'मधून जिल्हा परिषद शाळांना नवी उभारी!

आर.बी.जी. फाऊंडेशनचा शैक्षणिक उपक्रम; ५०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

पुढारी वृत्तसेवा

​नाशिक : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आत्मीयता निर्माण व्हावी, शिक्षणाची गोडी वाढावी आणि शाळांवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने नवी मुंबईच्या आर. बी. जी. फाऊंडेशनने 'उत्सव शिक्षणाचा; आनंद विद्यार्थ्यांचा' हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला मालेगाव तालुक्यातील जळगाव (निंबायती) येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिसरातील ६ जिल्हा परिषद शाळांतील सुमारे ५०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.

आर.बी. जी. फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. मधुरा गेठे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आपलेपणा निर्माण व्हावा या उद्देशाने आणि शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी फाऊंडेशनने पहिल्या टप्प्यात जळगाव (निंबायती) परिसरातील शाळांमध्ये हा उपक्रम हाती घेतला आहे.

'शिक्षण हा आनंदाचा उत्सव असावा'

कार्यक्रमात बोलताना मधुरा गेठे म्हणाल्या, "ग्रामीण भागातील आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अफाट क्षमता आहे. शिक्षण हे मुलांसाठी ओझे नसून आनंदाचा उत्सव असला पाहिजे. आज विद्यार्थ्यांच्या हातात दिलेली स्कूल बॅग ही केवळ शालेय वस्तू नसून त्यांच्या स्वप्नांना दिलेली नवी दिशा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आर.बी.जी. फाऊंडेशन सातत्याने कार्यरत राहील." कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्याबद्दल आभार मानून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिली.

या कार्यक्रमास अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेंद्र (नाना) पाटील, जळगावच्या सरपंच वाल्याबाई विठोबा पटांगरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश भिला दुकळे, येसगावचे सरपंच सुरेशजी शेलार, मेहुणेचे सरपंच आबासाहेब देवरे, निंबायतीचे सरपंच रतिलाल शेवाळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी भागा कराळे, जळगावचे उपसरपंच बाळासाहेब मिसकर यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजोळच्या आठवणींनी मधुरा गेठे भावूक

कार्यक्रमादरम्यान मधुरा गेठे यांनी आपल्या आजोळाच्या आठवणींना उजाळा दिला. "मुलगी कितीही दूर गेली, तरी माहेर आणि आजोळाची ओढ कधीच कमी होत नाही. या गावात येताना मला नेहमीच स्वतःच्या घरी आल्यासारखे वाटते," असे त्या म्हणाल्या.

"शिक्षण ही केवळ पदवी मिळविण्याची प्रक्रिया नाही, तर सक्षम आणि सुसंस्कृत समाज घडविण्याचा पाया आहे. जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे हास्य फुलविण्यासाठी आर.बी.जी. फाऊंडेशन सातत्याने कार्यरत राहील."
मधुरा गेठे (अध्यक्षा, आर.बी.जी. फाऊंडेशन)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT