सोनोग्राफी केंद्र  Pudhari News Network
नाशिक

Nashik News | अनधिकृत सोनोग्राफी केंद्र शोधमोहीम जूनपासून

18 पथकांची नियुक्ती; तीन महिन्यांत तपासणी अहवाल देणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महापालिका क्षेत्रात स्त्री जन्माचे प्रमाण पुरूषांच्या तुलनेत घटत असल्यामुळे स्त्री भ्रूणहत्येच्या वाढत्या संशयाला बळ मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने १ जूनपासून अनधिकृत सोनोग्राफी केंद्र शोधमोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

अनधिकृत सोनोग्राफी केंद्र शोधमोहिमेअंतर्गत शहरातील सर्व ४१३ सोनोग्राफी केंद्रांची तपासणी केली जाणार असून, गर्भपात केंद्रे आणि रुग्णालयांचाही आढावा घेतला जाईल. अवैधरित्या गर्भलिंग निदान करणाऱ्या केंद्र चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सप्टेंबर २०२४ मध्ये महात्मानगर येथील पंड्या हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपात केंद्र चालवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. एका मातेच्या मृत्यू चौकशीदरम्यान महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने तपासणी केली असता, मोठ्या प्रमाणावर गर्भपाताच्या औषधांचा साठा आढळून आला. यामुळे नाशिकमध्ये स्त्री भ्रूणहत्येची शक्यता अधोरेखित झाली. विशेषतः शहरातील मुलींचा जन्मदर कमी होणे चिंताजनक ठरले आहे. गर्भलिंगनिदान कायद्याने गुन्हा असून, सोनोग्राफी केंद्रांना याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही छुप्या पध्दतीने गर्भलिंग निदान होत असल्याचे मुलींच्या घटलेल्या जन्मदराच्या आकडेवारीवरून समोर आल्याने वैद्यकीय विभागाने शहरातील सोनोग्राफी केंद्रे, गर्भपात केंद्रांच्या तपासणीचा निर्णय घेतला आहे. यासाठी १८ पथके तयार करण्यात आली असून प्रत्येक पथकात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तीन महिन्यात तपासणीचा अहवाल सादर केला जाणार आहे. अवैधरित्या गर्भलिंग निदान होत असल्याचे आढळून आल्यास अथवा सोनोग्राफी केंद्र, गर्भपात केंद्रांमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर गर्भलिंग निदान कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे.

  • शहरातील नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्र - ४१३

  • सद्यस्थितीत सुरू असलेली सोनोग्राफी केंद्रे - ३९४

  • बंद असलेली सोनोग्राफी केंद्रे - ८

  • न्यायप्रविष्ठ प्रकरणे असलेली सोनोग्राफी केंद्रे - ११

  • शहरातील एकूण गर्भपात केंद्रे - १७१

  • शासकीय रुग्णालयातील गर्भपात केंद्रे - ८

  • खासगी गर्भपात केंद्रे - १६४

गतवर्षी मुलींचा जन्मदर ८८७

जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत शहरातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १२,२४२ मुलांचा जन्म झाला. त्याच्या तुलनेत केवळ १०,८६३ मुली जन्माला आल्या. त्यामुळे दर हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर ८८७ इतका नोंदवण्यात आला. विशेष म्हणजे, सप्टेंबर महिन्यात मुलींचा जन्मदर सर्वात नीचांकी, केवळ ८१७ इतका होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT