चांदवड (नाशिक): मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटाची रचना चुकीच्या पद्धतीने झाल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत आणि प्रवाशांना जीव गमवावा लागत आहे. राहुड घाटावर सरळ उड्डाणपूल उभारून महामार्ग सुरक्षित करावा, या मागणीसाठी शनिवार (दि. 4) प्रेस क्लब उमराणे, चिंचवे, सांगवी आणि तिसगाव येथील ग्रामस्थांनी राहुड घाटाच्या पायथ्याशी हनुमान मंदिराजवळ आंदोलन केले. यावेळी अपघातात प्राण गमावलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रतीकात्मक स्मशानभूमी उभारून गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांकडे निवेदन देण्यात आले.
मुंबई-आग्रा महामार्गाचे चौपदरीकरण होत असताना राहुड घाटात उड्डाणपूल उभारला असता तर अनेक प्रवाशांचे जीव वाचले असते. मात्र तत्कालीन लोकप्रतिनिधी आणि अधिकार्यांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे हा घाट कायम ठेवण्यात आला, ज्यामुळे तीव्र उतार आणि वळणांमुळे वारंवार अपघात होत आहेत. या अपघातांत अनेकांना जीव गमवावा लागला असून, काही जण कायमचे अपंग झाले आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सध्या महामार्गाचे सहापदरीकरण मंजूर झाले आहे. त्यामुळे राहुड घाट ते चिंचवे गावदरम्यान सरळ उड्डाणपूल उभारल्यास अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. त्यांनी या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याची प्रशासनाला विनंती केली आहे.
या आहेत मागण्या ...
तत्काळ राहुड घाटाचा रस्ता सरळ करून धोकादायक वळण आणि उतार त्वरित दुरुस्त करावा. चिंचवे - निंबायती गावाजवळ कायमस्वरूपी सुरक्षित रस्ता, उड्डाणपूल आणि रुंदीकरणाची कामे करावी. चौपदरीकरण होईपर्यंतही या दोन ठिकाणी आपत्कालीन पातळीवर योग्य उपाययोजना करावी.