आदिवासी अध्यासन केंद्रे  Pudhari News Network
नाशिक

Nashik News | राज्यातील विद्यापीठांमध्ये सुरू करणार आदिवासी अध्यासन केंद्रे

Tribal study center : उच्च व तंत्र शिक्षणातील आदिवासींचे प्रमाण वाढविण्यावर भर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आसिफ सय्यद

आदिवासी परंपरा आणि महाराष्ट्रातील लोकांचा व्यापक अभ्यास करण्यासाठी, तसेच आदिवासी विद्यार्थ्यांचे उच्च व तंत्र शिक्षणातील प्रमाण वाढवून त्यांना रोजगारक्षम करण्यासाठी सार्वजनिक विद्यापीठांतील आदिवासी अध्यासन केंद्रांचे बळकटीकरण व नवीन आदिवासी अध्यासन केंद्रांची स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार सार्वजनिक विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सुविधा व त्याद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. विशेषत:, गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाची संकल्पना आणि स्थापनाच मुळात आदिवासी समुदायांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याच्या द़ृष्टिकोनातून करण्यात आली. तथापि, महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांच्या भौगोलिक क्षेत्रात राहणार्‍या आदिवासी विद्यार्थ्यांना स्थलांतरित होऊन गोंडवाना विद्यापीठाद्वारे प्रदान केल्या जाणार्‍या उच्च शिक्षणाच्या संधीचा लाभ घेणे शक्य होत नाही. त्यामुळे राज्यातील आदिवासीबहुल क्षेत्रातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या मागणीनुसार अस्तित्वातील आदिवासी अध्यासन केंद्रांच्या बळकटीकरणाची तसेच नवीन आदिवासी अध्यासन केंद्रांच्या स्थापनेचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

आदिवासींचे उच्च शिक्षणातील प्रमाण कमी

सन 2011 च्या जनगणनेनुसार राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 9.35 टक्के आदिवासी लोकसंख्या आहे. सन 2020-21 मधील महाराष्ट्रातील आदिवासींचे उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाण 18.9 टक्के आहे, जे 28.4 टक्के या राष्ट्रीय सरासरी नोंदणी प्रमाणापेक्षा खूपच कमी आहे.

आदिवासी अध्यासन केंद्रांची गरज का?

आदिवासी सांस्कृतिक परंपरा, कलाकृती, भाषा आणि सामाजिक - आर्थिक ओळख जपण्यासाठी, आदिवासी साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी, नवोदित आदिवासी लेखकांना त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यास प्रोत्साहित करणे, विविध कार्यक्रमांद्वारे आदिवासी संस्कृती, आदिवासी लोकगीते, लोकनृत्य आणि लोकसंगीताचा प्रचार करण्यासाठी आदिवासी अध्यासन केंद्रांच्या स्थापनेची गरज होती.

आदिवासी अध्यासन केंद्रांच्या कार्याची व्याप्ती

आदिवासी अध्यासन केंद्रांमार्फत आदिवासींच्या सामाजिक - आर्थिक, सांस्कृतिक, भाषा आणि जीवनावर आवश्यक संशोधन कार्य आणि सर्वेक्षण केले जाईल. महाराष्ट्रातील आदिवासी सांस्कृतिक परंपरांचे दस्तावेजीकरण करण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी या केंद्रांची असेल. आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजनांवर माहिती देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा, चर्चासत्रे, परिषदा आयोजित करण्यात येतील.

‘या’ विद्यापीठांमध्ये होणार अध्यासन केंद्रे

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व मुंबई विद्यापीठ येथे आदिवासी अध्यासन केंद्रे कार्यरत आहेत. या आदिवासी अध्यासन केंद्रांना बळकटी देण्याचा व आदिवासीबहुल क्षेत्रातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे नव्याने आदिवासी अध्यासन केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT