नाशिक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नाशिक प्रादेशिक अधिकारीपदी एका मंत्र्यांच्या शिफारशीवरून महसूलच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली. मात्र दुसऱ्या मंत्र्याला विश्वासात न घेतल्यानेे पदभाराची प्रक्रिया रखडवली, तर तिसऱ्या मंत्र्याला आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यास त्या खुर्चीवर बसवायचे असल्याने, नाशिक एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी पदाचा गुंता वाढत असल्याचे दिसून येत आहे. आता यात उद्योजकांनीही उडी घेतली असून, 'निष्कलंक' अधिकारीच द्यावा अशी आग्रही मागणी केली आहे. (Maharashtra Industrial Development Corporation)
मागील काही वर्षांत जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील भूखंड वाटपातील अफरातफर, उद्योग क्षेत्रात बिल्डर्सचा शिरकाव, परवनाग्यांसाठीची देवाणघेवाण चर्चेत आहे. गेल्या अधिवेशनात आमदार सुहास कांदे, सीमा हिरे यांनी लक्षवेधी मांडत औद्योगिक क्षेत्रात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर एमआयडीसीमध्ये फेरबदल करण्यात आले असून, कार्यकाळ संपलेले प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांची गेल्या ३१ जुलै रोजी बदली होऊन पनवेल येथे भूसंपादन विभागात नियुक्ती करण्यात आली आहे, तर त्यांच्या जागी गेल्या ६ ऑगस्ट रोजी उपजिल्हाधिकारी गणेश राठोड यांची प्रादेशिक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेशही महसूल आणि वन विभागाने काढले आहेत. मात्र, १३ दिवसांनंतरही त्यांनी पदभार स्वीकारला नसल्याने उद्योग वर्तुळात चर्चा रंगत आहे. सूत्रानुसार, उद्योग विभागाला विश्वासात न घेताच त्यांनी महसूल व वनविभागाकडून नियुक्तीचे आदेश प्राप्त केल्याने त्यांच्या नावावर फुली मारली आहे, तर त्यांच्याऐवजी उपजिल्हाधिकारी दीपक पाटील यांचे नाव चर्चेत आल्याने, मंत्री स्तरावरील घडामोडींची खमंग चर्चा उद्योग वर्तुळात रंगत आहे.
गणेश राठोड हे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मर्जीतील असल्याचे बोलले जाते. त्यांच्याकडे ते ओएसडी म्हणून कार्यरत होते. त्यांचे नाव महसूलमंत्र्यांमार्फतच पुढे केल्याची चर्चा आहे, तर उद्योग विभागाला विश्वासात न घेतल्याने, दीपक पाटील यांच्या नावाबाबत उद्योग विभाग सकारात्मक असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे या पदासाठी पालकमंत्र्यांचे ओएसडी असलेले महेंद्र पवार यांचे नावदेखील सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. त्यांनी, पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून यापूर्वीच शिफारसपत्रही मिळविले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे प्रादेशिक अधिकारीपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार याविषयी उद्योगवर्तुळात एकच चर्चा रंगत आहे.
झपाट्याने वाढणाऱ्या नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रासाठी निष्कलंक आणि प्रामाणिक अधिकाऱ्याची गरज आहे. भ्रष्टाचाराचे वा अन्य आरोप असलेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक केल्यास, त्याचा परिणाम उद्योगवाढीवर होऊ शकतो. त्यामुळे निष्कलंक अधिकारीच नेमावा अशी आमची उद्योग विभागाकडे मागणी आहे.धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा. नाशिक.
आतापर्यंत एकही आरोप नाही तसेच प्रतिमा चांगली आहे, अशाच अधिकाऱ्याची नेमणूक करावी. नाशिकचा उद्योग वाढण्यासाठी स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारीपदी असणे गरजेचे आहे. नाशिकचा उद्योग वाढण्यासाठी त्यांच्याकडून प्रामाणिक प्रयत्न व्हावा हा आमचे हेतू आहे.ज्ञानेश्वर गोपाळे, विश्वस्त, आयमा. नाशिक.