Amit Shah, Minister of Home Affairs of India
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा.  (संग्रहित छायाचित्र)
नाशिक

Nashik News | 'गृह'च्या पश्चिम विभागीय बैठकीचा मान नाशिकला

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आंतरराज्य परिषद सचिवालयातर्फे २ ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये २७ व्या पश्चिम विभागीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती लाभण्याची शक्यता आहे. त्यामुळे बैठकीच्या अनुषंगाने महसूल प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. (Amit Shah, Minister of Home Affairs of India)

आंतर-राज्य परिषद सचिवालयातर्फे दरवर्षी पश्चिम विभागीय परिषदेचे आयाेजन करण्यात येते. यंंदाच्या वर्षी सचिवालयाने महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने परिषद घेण्याचे निश्चित केले आहे. परिषदेसाठी नाशिकची निवड करण्यात आली आहे. परिषदेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यांसह दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव प्रदेशाची ही परिषद असणार आहे. या बैठकीला अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच संबंधित राज्यांचे मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सदस्य ८० हून अधिक जण उपस्थित राहणार आहेत.

केंद्र सरकारचा परिषदेच्या माध्यमातून राज्यांच्या सशक्तीकरणासह केंद्र व राज्यांतील धोरणात्मक आराखडा व संघराज्य वादावर भर देण्याचा प्रयत्न आहे. त्याअनुषंगाने दरवर्षी परिषदा घेण्यात येत आहे. गेल्या वर्षी गांधीनगर (गुजरात) येथे परिषद घेण्यात आली. यंदाच्या वर्षी ही परिषद नाशिकला परिषद घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी जलज शर्मा व निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ तयारीवर भर देत आहे.

बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा

पश्चिम विभागीय परिषदेत महिला व बालकांवरील लैंगिक गुन्ह्यांचा आणि बलात्काराच्या प्रकरणांचा जलद तपास, बलात्कार आणि पॉक्सो कायद्यातील खटल्यांच्या निपटाऱ्यासाठी जलदगती विशेष न्यायालयांच्या (एफटीएससी) योजनेची अंमलबजावणी तसेच सर्वसामान्यांच्या समस्यांवर चर्चा होणार आहे.

SCROLL FOR NEXT