नाशिक : हरेश शाह यांच्या पिंपळगाव बसवंत येथील पक्षितीर्थ सामाजिक पर्यटन केंद्रावर उपस्थित पर्यटक.  Pudhari News Network
नाशिक

Nashik News | राज्याचा 'प्रवास' आता 'सामाजिक' पर्यटनाकडे!

नावाजलेली स्थळे होणार पर्यटन केंद्रे ; पर्यटकांनाही मिळणार समाजकार्याची प्रेरणा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : निल कुलकर्णी

धार्मिक, कृषी, आरोग्य आणि वैद्यकीय आदी पारंपरिक पर्यटनानंतर राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने आपले 'नेक्स्ट डेस्टिनेशन' म्हणून सामाजिक कार्य पर्यटनाकडे 'प्रवास' आरंभला आहे. व्यक्ती, संस्थांनी गावात सामाजिक कार्यातून केलेले काम याद्वारे पर्यटकांसमोर मांडले जाणार आहे.

सामाजिक कार्य पर्यटन स्थळे म्हणून उदयास येणार असून त्याचे ब्रॅण्डिंग, प्रसिद्धी, प्रमोशन हे पर्यटन विभाग करणार आहे. यामुळे पर्यटनवृद्धीसह त्या संस्था, गावांची ओळख सर्वदूर पोहोचण्यास मदत होणार आहे. तसेच पर्यटकांनाही समाजकार्याची प्रेरणा मिळणार आहे.

राज्यातील काही सामाजिक पर्यटन स्थळे

  • वर्ल्ड गिनिज रेकॉर्डमध्ये नोंद असलेले हरेश शाह यांचे पिंपळगाव बसवंत येथील 'पक्षितीर्थ'

  • डॉ. प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा, गडचिरोली

  • बिजमाता राहिबाई पोपरे यांनी विकसित केलेले सेंद्रिय बीज बँक व शिवार

  • पोपटराव पवार यांनी विकसित केलेले हिवरे बाजार, अहिल्यानगर

  • कुमारमंगलम आर्टिलरी म्युझियम, नाशिक रोड कॅम्प, नाशिक.

महाराष्ट्रातील पर्यटन केंद्रांची प्रसिद्धी देशासह जगभर होऊन पर्यटकांचा ओघ वाढावा आणि त्यातून अर्थच्रकाला गती मिळावी यासाठी राज्याचे पर्यटन संचालनालय विविध अभिवन आणि कल्पक उपक्रम रावबत असते. याच शृंखलेत आता 'सामाजिक पर्यटन' संकल्पना राबवली जाणार आहे. डॉ. प्रकाश आमटे (हेमलकसा), पोपटराव पवार (हिवरे बाजार) यांसारख्या व्यक्ती, संस्थांच्या सामाजिक कार्याचा आदर्श पर्यटनाद्वारे अधोरखित केला जाणार आहे. या संस्थांनी केलेले सामाजिक कार्य ते ठिकाणाची सामाजिक पर्यटन केंद्र म्हणून अधिक सुनियोजित व सर्वंकष ब्रॅण्डिंग पर्यटन विभाग करणार आहे. त्यामुळे ती गावे, स्थळे जागतिक नकाशावर अधाेरेखित होणार आहेत. शासनातर्फे या स्थळांचे ब्रॅण्डिंग होणार असल्याने 'एमटीडीसी'च्या पाठबळामुळे या स्थळांवर पर्यटनवृद्धीसह संबंधित संस्थांनाही त्याचा निश्चितच लाभ होणार आहे.

पारंपरिक पर्यटनाशिवाय नवा पर्यटक वर्ग तयार झाला आहे, ज्याला सामाजिक कामात, 'एनजीओं'ची पद्धती जाणून घेण्यात रस आहे. अशा व्यक्ती किंवा स्वयंसेवी संस्थांचे काम कसे चालते, त्यातून झालेला विकास, नवनिर्माण, बदल पाहण्याची जिज्ञासा या वर्गात दिसते. याच लोकांसाठी पर्यटन'पॅकेज' तयार केले. अशा व्यक्ती, संस्थांना भेट देऊन, त्यांचे कार्य समजून घेण्यासाठी पर्यटन त्यांच्या स्थळांना भेट देण्यासह त्यांचे कामाचे स्वरूप, विकास, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतील. त्यामुळे ही सामाजिक स्थळे जागतिक नकाशावर अधोरेखित होतील.
जगदीश चव्हाण, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी कार्यालय, नाशिक.
पारंपरिक पर्यटनासह नवीन पर्यटनासाठी लोकांमध्ये आवड वाढलेली दिसते. त्यातून 'सामाजिक कार्य पर्यटन' संकल्पना वाढीस लागणार आहे. नव्या पिढीसह अनेकांना सामाजिक बांधिलकी, देशासाठी समाजकार्य करण्याची अथवा ते कसे चालते, ते जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यामुळेच वाघ बघायला 'ताडोबा' जंगलात जाणारा पर्यटक आवर्जून डॉ. प्रकाश आमटेंच्या लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देतोच. सामजिक पर्यटनातून लोकांना समाजकार्याची आवड निर्माण होऊन समाजकार्य करण्याचीही प्रेरणा मिळणार आहे.
दत्ता भालेराव, पर्यटन अभ्यासक, नाशिक
२०२२ मध्ये जगातील सर्वात अजस्र 'बर्ड फिडर' उभारले आणि पर्यटकांचा ओघ सुरू झाला. गावात येणारे शेकडो लोक कुतूहलाने एकाच वेळी शेकडो पक्षी कसे धान्य टिपतात याचा अनुभव घेत असतात. येथे लावलेल्या शेकडो कृत्रिम घरट्यांत पक्ष्यांची पिले वाढत असतात. त्यांच्या चिवचिवटाचे पसायदान ऐकण्यासाठी येणाऱ्यांना मोठा अनुभव येतोच. पर्यटन विभागाने हा प्रकल्प सामाजिक पर्यटन केंद्र म्हणून घोषित केल्यामुळे आमचे नाव जागतिक नकाशावर पर्यटन केंद्र म्हणून घोषित झाले याचा आनंद आहे.
हरेश शाह, 'पक्षितीर्थ'चे निर्माते, पिंपळगाव बसवंत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT