पुढारी ऑनलाइन डेस्क : नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील दिव्यांग असलेले आणि वृत्तपत्र विक्री व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणारे रमेश सोनवणे यांचा मुलगा कुणाल सोनवणे याने स्वबळावर आयर्लंड येथील महाविद्यालयाची शिष्यवृत्ती मिळाली असून, तो उद्या बुधवारी (दि.८) आयर्लंड येथे शिक्षणासाठी जात आहे.
रमेश सोनवणे गेले अनेक वर्षांपासून पंचवटीतील जुना आडगाव नाका परीसरात वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करत असून, त्यांची परिस्थिती देखील अगदी बेताची आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुली अन् एक मुलगा असा परिवार आहे. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने कुणालच्या आईनेही पंचवटीतील गजानन चौकात पेपर विक्रीचा स्टॉल लावला आहे. वृत्तपत्र विक्री करून ते आपला उदरनिर्वाह चालवतात. अशा परिस्थितीतही कुणालने न डगमगता चिकाटीने दहावी व पुढे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं.
पूर्वी कुणाल हाही आई-वडिलांना वृत्तपत्र व्यवसायात मदत करत असे. कुणालला इयत्ता १० वीमध्ये ८८ टक्के गुण मिळाले होते. त्यावेळी १० वी नंतर त्याने के. के. वाघ पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सॉफ्टवेअरमध्ये डिप्लोमा केला. त्यानंतर त्याने महावीर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सॉफ्टवेअर मध्ये इंजिनिअरिंग करून ९२ टक्के गुण मिळवत फस्ट क्लास मिळवला. त्यानंतर दोन वर्षे पुण्यातील इन्फोसिस कंपनीत काम केले. काम करत असताना त्याने शिक्षणाची जिद्द सुरूच ठेवली आता त्याला नॅशनल कॉलेज ऑफ आयर्लंड येथील महाविद्यालयाची शिष्यवृत्ती मिळाली असून, तो येत्या काही दिवसांत आयर्लंड येथे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) यावर मास्टर डिग्री शिक्षणासाठी रवाना होणार आहे. सोनवणे यांना दोन मुली असून, त्यांचे विवाह झाले असून, मुलगाही आता परदेशात शिक्षणासाठी जाणार असल्याने त्यांच्या कष्टाचे चीज झाले आहे.