गोण्यांमधून मुरुम, विटा, दगड आणून खड्डे बुजविण्याची धडपड pudhari photo
नाशिक

Nashik News | रिक्षा चालकाची खड्डे बुजविण्याची धडपड

पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच बोर्डाच्या वार्ड क्रमांक सातमधील धोंडीरोड मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त आहेत. प्रशासनास विनंती करूनही दखल घेतली जात नसल्याने रिक्षाचालक सुरेश गुळवे यांनी स्वतः पुढाकार घेत आपल्या रिक्षातून मुरुम, विटा, दगड गोण्यांमधून आणून त्या माध्यमातून स्वतः खड्डे बुजवत आहे. याबाबत फोटो व माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांचे कौतुक करताना प्रशासनाला जागे होण्याचे आवाहन केले आहे.

शिंगवे बहुला अंबडवाडी मार्गावरील धोंडी रोड हा एकमेव वाहतुकीचा मार्ग असून या रोडवर पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले आहेत. त्यातून वाहतूक करणे दुचाकी व चार चाकी वाहनांना त्रासदायक ठरत आहे. त्यातच रिक्षावर पोट पाणी असलेल्या अनेकांना या खड्ड्यांचा त्रास होऊन वाहनांचे हे नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सुरेश गुळवे या रिक्षाचालकांनी कोणाच्या मदतीची वाट न बघता स्वतः रानातून मुरूम व दगड, गोटे आपल्या रिक्षातून आणून ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी घेऊन जातात व स्वतः पाटी पावडेच्या साह्यायाने मेहनत करून खड्डे भरण्याचे काम करीत आहेत.

सोशल मीडियात आवाहन 

त्यांच्या या सामाजिक कार्याला अनेकांनी सलाम करताना या सामाजिक कार्यात आपणही सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन सोशल मीडियात केले आहे. लवकरच या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक खड्डे बुजवा मोहीम हाती घेऊन या परिसरात एक नवा आदर्श निर्माण करण्याच्या तयारीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT