नाशिक : शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत शहरात आता २९ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सची उभारणी केली जाणार आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात २० चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना होती. मात्र यासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत अडीच कोटींची बचत झाल्यामुळे या बचत निधीतून आणखी नऊ चार्जिंग स्टेशन्सची उभारणी केली जाणार आहे.
इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सला महासभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहरातील पंचवटी, नाशिक रोड, सिडको या भागांत आणखी नऊ चार्जिंग स्टेशन्सच्या उभारणीचे काम हाती घेतले जाणार आहे.
राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियान अर्थात एन-कॅप अंतर्गत केंद्र शासनाने महापालिकेला हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी राबवायच्या उपाययोजनांकरिता ८५ कोटींचा निधी दिला आहे. मात्र त्यातील ६० कोटींचा निधी अद्याप अखर्चित आहे. या निधीतून आतापर्यंत यांत्रिकी झाडू, रस्त्यालगत हरित क्षेत्रनिर्मिती, सायकल ट्रॅक, विद्युतदाहिनी या योजनांवर खर्च झाला. शासनाच्या ई-व्हेईकल धोरणाला चालना देण्यासाठी पहिल्या टप्प्यात शहरात २० ठिकाणी स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी १० कोटी खर्चाचे उद्दिष्ट होते. दरम्यान, यासंदर्भातील निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर २५ टक्के कमी दराने हेच काम सर्वोटेक पॉवर सिस्टीम लिमिटेड या कंपनीने करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे १० कोटींचे काम आता सात कोटी ४३ लाखांत होणार असल्यामुळे बचत झालेल्या दोन कोटी ५७ लाख रुपयांच्या निधीतून आणखी नऊ नवीन चार्जिंग स्टेशन्स हाती घेतली जाणार आहेत.
पहिल्या टप्प्यात मुख्यालय राजीव गांधी भवन, पश्चिम विभागीय कार्यालय, पूर्व विभागीय कार्यालय, नाशिक रोड विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय, सिडको विभागीय कार्यालय, तपोवन बस डेपो, अमरधाम फायर स्टेशन पंचवटी, सातपूर फायर स्टेशन, राजे संभाजी स्टेडियम सिडको, बिटको हॉस्पिटल, कृषिनगर जॉगिंग ट्रॅक, बी. डी. भालेकर मैदान, प्रमोद महाजन उद्यान, महात्मानगर क्रिकेट मैदान, दादासाहेब फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी बाजार इमारत, लेखानगर मनपा जागा, अंबड लिंकरोडवरील मनपा मैदान या २० ठिकाणी चार्जिंग स्टेशन्सची उभारणी केली जात आहे.
सदाशिव मोरे नाट्यगृह हिरावाडी, पंचवटी
मनपा आरोग्य केंद्र कालिकानगर, पंचवटी
मनपा क्रीडांगण शिवनगर, पंचवटी
कामटवाडे मनपा शाळा कामटवाडे, सिडको
सर्व्हे नं. २९६ चर्चजवळ मनपा जागा शुभम पार्क, सिडको
सोमाणी उद्यानालगत (जुना पे ॲण्ड पार्क ठिकाणी) नाशिक रोड
निसर्गोपचार केंद्र क्रीडांगणालगत, नाशिक रोड
विहितगाव शाळा, वडनेर रोड पाण्याच्या टाकीजवळ