नाशिक : चित्रकृतीविषयक माहिती देताना प्रा. सुहास जोशी.  (छाया : रुद्र फोटो)
नाशिक

Nashik News | एकाग्रता, सर्जकतेचा सुवर्ण कोंदण ‘गाभारा’

22 कॅरेट सोने फॉइलमध्ये तंजावूर शैली कलाकृती : रसिकांवर सुवर्ण मोहिनी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : एकाग्रता, चिकाटी, अभिनवता व सर्जकतेने चित्रकृतींवर ३ ते ४ महिन्यांच्या परिश्रमाचे शिंपण करत सुवर्ण कोंदणाचा परिणाम देणाऱ्या सोनेरी ‘लिफ’, मौल्यवान खडे कुंदन जडावाचे अलंकरणाचे ‘तंजावूर’ कलाकृती रसिकांवर सुवर्ण मोहिनी घालत आहेत.

तिडके कॉलनीतील इंडेक्स गॅलरीत चित्रकर्ती प्रा. सुहास जोशी व त्यांच्या शिष्यांच्या ‘गाभारा’ प्रदर्शनाला प्रारंभ झाला. प्रदर्शनात १३ जणींचे २६ चित्रे आहेत. नृसिंह, धनलक्ष्मी, नटराज, विश्वकर्मा, गणेश, शिवशंकर, चामुंडा देवी या देवी-देवतांसह साजशृंगार करणारी लावण्यवती, पोपटासह सुंदरी, गजराज आदींचा सुवर्णसाज पहाताक्षणी भूरळ घालतो.

प्रथमच अशा शैलीचे प्रदर्शन भरवण्यात आल्याने नाशिककरांसाठी कलापर्वणी ठरत आहे. जोशी यांच्या प्रथम बॅचमधील या विद्यार्थिनी प्रथमच ही चित्रे काढली आहेत. क्युरेटर स्नेहल तांबुलवाडीकर यांनी रचना, मांडणी केली असून, प्रदर्शन २३ मार्चपर्यंत सर्वांसाठी मोफत खुले आहे.

तंजावूर शैलीत चितारलेल्या देवी देवतांच्या चित्रकृती

साऱ्या जणी हौशी कलाकार...!

लिला शिरोडे, शिल्पा भाटीया, श्रद्धा शेतकर, अंजली भाटे, सुषमा पाटील, वसुधा साठे, सुनीता शिरोडे, रितू जैन यांच्या कलाकृती प्रदर्शनात आहेत. यातील कुणीही व्यावसायिक चित्रकर्मी नसूनही सर्वांची कामे व्यावसायिक दर्जाची आहेत. विशेष म्हणजे सर्वात कमी वयाच्या मेघालयातील इबान दला धर हिने प्रदर्शनात ५ प्रक्रिया चित्रे आणि गजराजचे चित्र साकारले आहे.

तंजावूर शैलीत चितारलेल्या देवी देवतांच्या चित्रकृती

अशी साकारली कलाकृती

‘तंजावूर’ ही प्राचीन, वैशिष्ट्यपूर्ण भारतीय चित्रशैली आहे. जाड लाकडी फळीवर मांजरपाटाचे कापड फेविकॉलच्या पाण्यात भिजवून चिकटवले जाते. त्यावर लाइम स्टोन, फ्रेंच चॉक पावडर मिश्रणामध्ये घालून त्याचे एकावर एक सहा ते सात थर दिले जातात. ते सुकल्यावर सँडपेपरने घासून गुळगुळीत केला जातो, तेव्हाच तो चित्रासाठी सिद्ध होतो. चित्रांमध्ये, कमानी, महिरपी, खांब आदींसाठी मकवर्क पद्धती वापरतात. खाण्याचा डिंक, लाइम स्टोन पावडर मिश्रणाच्या कोनवर्कमधून उठाव पद्धतीचे काम केले जाते. अलंकरणासाठी विविधरंगी, विविध आकारांचे मौल्यवान खडे, मोती, हिरे वापरले जातात. उठाव काम, खड्यांवर २४ कॅरेट सोन्याची फॉइल (सुवर्ण लिफ) लावली जाते. खडे मोती, हिरे यावरची फॉइल कोरून कोंदणाचा परिणाम साधला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT