नाशिक : महावितरणचे मुख्य अभियंता कुमठेकर यांना प्रश्न विचारताना संतप्त उद्योजक. व्यासपीठावर संजीव भोळे, प्रवीण भालेराव, ज्ञानदेव पडळकर, धनंजय बेळे, निखिल पांचाळ आदी. pudhari news network
नाशिक

Nashik News | मुख्य अभियंत्यांसमोरच काढले महावितरणचे वाभाडे

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : ढिसाळ कारभार, निष्क्रीय कर्मचारी, कालबाह्य यंत्रणा, अपुरे मनुष्यबळ, देखभाल दुरुस्तीच्या नावे कामचुकारपणा अशा एक ना अनेक बाबींमुळे महावितरणचा जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसत आहे. वारंवार लेखी तक्रारी करूनही अधिकारी, कर्मचारी कामात कसूर करीत असल्याचा आरोप करीत संतप्त उद्योजकांनी मुख्य अभियंत्यांसमोरच महावितरणचे वाभाडे काढले. यावेळी उद्योजकांनी प्रश्नांची सरबत्ती करीत अडचणींचा पाढा वाचला. मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी उद्योजकांसमोरच उपस्थित कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढात तत्काळ कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले.

या मुद्यांवरून उद्योजक आक्रमक

  • वीजेचा अखंडपणे पुरवठा सुरू ठेवावा

  • शटडाऊन, वीजेच्या कमी-जास्त दाबामुळे उत्पादनावर परिणाम

  • फिडरचे ब्रेकर बदलावे

  • गंजलेले डीपी बॉक्स त्वरीत बदलावे

  • कुशल मनुष्यबळ वाढवावे

  • देखभाल, दुरुस्तीसाठी पुरेसे साहित्य उपलब्ध करून द्यावे

निमाच्या वतीने सातपूर येथील निमा हाऊस सभागृहात शुक्रवारी (दि.२७) वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत जिल्ह्यातील उद्योजकांची बैठक आयोजित केली होती. बैठकीस मुख्य अभियंता कुमठेकर यांच्यासह महापारेषणचे मुख्य अभियंता संजीव भोळे, अधीक्षक अभियंता प्रवीण भालेराव, ज्ञानदेव पडळकर यांच्यासह सातपूर, अंबड, सिन्नर, दिंडोरी, शिंदे पळसे, गोंदे, वाडीवऱ्हे, पाडळी, इगतपूरी येथील उद्योजक उपस्थित होते. निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी महावितरणच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवत, उद्योजकांच्या वीज विषयक समस्या त्वरित न सोडल्यास कुणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा दिला. दिंडोरी तसेच ग्रामीण भागातील तालुक्यांमधील उद्योजकांनी पैसे भरूनही गेल्या अनेक दिवसांपासून वीज जोडणी केली गेली नाही. वीज हाच उद्योजकांचा आत्मा असून, शटडाऊनसारखे प्रकार होणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. नव्या सब स्टेशनला गती द्यावी. वीजेच्या लपंडावामुळे कोट्यावधींचे नुकसान होत असल्याचे बेळे यांनी सांगितले. त्यावर कुमठेकर यांनी कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करीत उद्योगांना वीजेच्या अडचणी येऊ नयेत याबाबत खबरदारी घेण्याचे आदेश दिले. यावेळी निमाचे सचिव निखिल पांचाळ, निमा सबकमिटीचे रवींद्र झोपे, रावसाहेब रकिबे, कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे, चेतन वाडे आदी उपस्थित होते.

महापारेषणेचे भोळे यांना सुनावले

'उद्योगांना आम्ही वीज देऊ शकत नाही' असे एमआयडीसीला पत्र देणाऱ्या महापारेषणचे मुख्य अभियंता संजीव भोळे यांना धनंजय बेळे यांनी खडेबोल सुनावले. दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथील एका उद्योजकाने वीस कोटी खर्चूनही गेल्या दोन वर्षांपासून वीज जोडणी केली नसल्याचे सांगितले असता, कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे यांनी ग्रामीण भागात उद्योग टाकताच कशाला असे बेजबाबदार विधान केल्याने उद्योजकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. उद्योगांना प्रोत्साहन न देता त्यांना उद्योग बंद करण्याची भाषा अधिकाऱ्यांनी करू नये असे बेळे म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT