नाशिक : नायलॉन मांजाचा वापर, विक्री व साठा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जिल्हाधिकारी, महापालिका तसेच पोलिस विभागाला दिले.
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर उपसभापती गोऱ्हे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयु्क्तालयातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पतंगबाजी करताना नायलॉन मांजाचा वापर रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी नागरिकांना नायलॉन मांजा वापरू नये, असे आवाहन केले आहे. नायलॉन मांजा एक पर्यावरणीय धोका असून ते पक्षी, प्राणी आणि मानवासाठी धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले. नायलॉन मांजा वापरणाऱ्यांविरुद्ध व साठवणूक करणाऱ्या विरुद्ध तसेच विक्री करताना आढळून आल्यास कारवाई केली जाईल. नायलॉन मांजामुळे अनेक पक्षी जखमी होत आहेत किंवा मृत्युमुखी पडत आहेत. याशिवाय, मानवी जीवितालाही यामुळे गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, विशेषतः सणासुदीच्या काळात, जेव्हा विविध जागांवर पतंगांची स्पर्धा असते. यात केवळ पारंपरिक दोऱ्याचा मांजा वापरण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, पर्यावरण विभागाचे प्रमुख अजित निकत उपस्थित होते.
महापालिकेच्या पर्यावरण विभाग आणि घनकचरा विभागाच्या वतीने शहर परिसरातील ८६ पतंग व मांजा विक्री दुकानांची तपासणी करण्यात आली. घातक नायलॉन मांजाची विक्री न करण्याचे आवाहन करण्यात आले, अशी माहिती पर्यावरण उपायुक्त अजित निकत यांनी दिली. नायलॉन मांजापासून संरक्षण होण्यासाठी दुचाकीस्वारांनी वाहनाच्या हॅण्डलला यू आकाराची सुरक्षा तार बांधावी. हेल्मेटचा वापर करावा. मफलर, स्कार्फ, फुलबाही असलेला शर्ट वापरावा, त्यामुळे नायलॉन मांजामुळे होणारी दुखापत टळू शकेल, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी केले आहे.
पतंगबाजी करताना नायलॉन मांजाचा वापर करू नये. नायलॉन मांजामुळे पशू-पक्ष्यांबरोबरच मानवी जीवालाही धोका आहे. त्यामुळे नायलॉन मांजाच्या वापरामुळे होणारे नुकसान ओळखून सामाजिक जबाबदारी घेतली पाहिजे.- मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका