गंगापूर धरण pudhari news network
नाशिक

Nashik News | गंगापूर धरणात चर खोदण्यासाठी सर्वेक्षण पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : गंगापूर धरणात चर खोदण्यासाठी सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या दोन दिवसांत सर्वेक्षक सल्लागारामार्फत अहवाल महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर चर मार्गात अडथळा ठरणारा खडक फोडण्यासाठी तसेच चर खोदणे व जॅकवेल उभारण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.

गेल्या वर्षी मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी नाशिक व अहमदनगरमधील धरणांतून ८.६ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात आल्यामुळे नाशिक महापालिकेच्या पाणी आरक्षणात कपात केली गेली. नाशिकककरांना पिण्यासाठी ६,१०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी असताना ७८६ दशलक्ष घनफूट कमी अर्थात ५,३१४ दशलक्ष घनफूट इतकेच पाणी आरक्षण दिले गेले. जूनअखेर धरणातील जलसाठ्याने तळ गाठल्याने जुलैत नाशिककरांवर जलसंकट उभे ठाकले होते. त्यामुळे धरणात चर खोदून मृतसाठा उचलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र चर मार्गात मोठा खडक अडथळा ठरत असल्यामुळे हा खडक फोडण्यासाठी सर्वेक्षक सल्लागाराची नियुक्ती महापालिकेने केली. या सर्वेक्षक सल्लागारामार्फत अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे गंगापूर धरणातील चर मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. यासंदर्भातील अहवाल येत्या दोन दिवसांत प्रशासनाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर चर खोदणे व जॅकवेल उभारण्याच्या कामासंदर्भात निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. धरणावरील महापालिकेच्या पंपिंग स्टेशनपासून सुमारे ६०० मीटर अंतरावर धरणाच्या मध्यात जॅकवेल खोदण्याची योजना आहे. याद्वारे धरणातील मृतसाठा पाइपलाइनद्वारे पंपिंग स्टेशनमध्ये आणला जाणार आहे. भविष्यात पाणीसंकट उद्भवल्यास हा मृतसाठा नाशिककरांची तहान भागवू शकणार आहे.

धरण भरल्यानंतरही चर खोदता येणार

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरण ८७ टक्के भरले आहे. धरणातून अल्पप्रमाणात विसर्गही सुरू आहे. मात्र धरण भरल्यानंतरही चर खोदण्याची प्रक्रिया सुरू ठेवता येणार आहे. चर मार्गातील खडक फोडल्यानंतर तराफ्यावरील जेसीबीसदृश यंत्रामार्फत चर खोदण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे धरणात जॅकवेल तयार करण्यासाठी आधी कॉफर डॅम तयार केला जाणार आहे. यासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT