नाशिक : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर पावले उचलत भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आदेशाने पाकिस्तानी नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेतला असता नाशिक शहरातही सहा पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जम्मू- काश्मीर येथील पहलगाम येथे मंगळवारी (दि. २२) दुपारी दहशतवाद्यांनी गोळीबार करीत २७ जणांची हत्या केली. या घटनेचा भारतासह जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांनीही दहशतवादास उत्तर देण्यासाठी आक्रमक पावले उचलत सिंधू जल करार स्थगित केला, अटारी सीमारेषा तत्काळ प्रभावाने बंद केली तसेच भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले आहे. पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सूट योजनेंतर्गत भारतात प्रवास करण्यास नाकारले, नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना भारत साेडण्याची आठवडाभराची मुदत दिली आहे. त्यामुळे भारतात थांबलेल्या पाकिस्तानी नागरिकांची धाबे दणाणले असून, त्यांना भारत सोडावा लागणार आहे. त्यानुसार नाशिक शहरातही तपासणी केली असता शहरात सहा पाकिस्तानी महिला नागरिक वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. या नागरिकांची माहिती प्रशासनास दिली जाणार असून, त्यांनी भारत देश सोडला की नाही याची खात्री यंत्रणा करणार आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. 48 तासांनंतर काही पाकिस्तानी नागरिक अद्यापही भारतात निवास करत असल्याचे आढळून आल्यास केंद्र सरकारकडून जिल्हा प्रशासनाला आदेशित करण्यात येईल. आदेशाप्रमाणे पाकिस्तानी नागरिकांचा त्वरित शोध घेऊन त्यांना परत पाठविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. सद्यस्थितीत गृहशाखेला अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आम्ही केंद्र सरकारच्या आदेशाची वाट पाहत आहोत.जलज शर्मा, जिल्हाधिकारी, नाशिक