सिडको (नाशिक) : रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद असणारी आणि उत्तर महाराष्ट्रात अल्पावधीत नावलौकिक मिळविणारी श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मुंबईनाका हॉटेल कोर्टयार्डसमोर असलेल्या अत्याधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन येत्या २ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांना परवडेल, अशी अत्याधुनिक सेवा देण्यास कटिबद्ध आहे. २००९ पासून सुरू केलेले हे रुग्णालय रुग्णांच्या विश्वासामुळेच नवनवीन टप्पे गाठत आले आहे. या रुग्णालयाची स्थापना डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी आणि डॉ. पल्लवी धर्माधिकारी यांनी केली आहे. नागरिकांना दर्जेदार व परवडणारी आरोग्यसेवा देण्याचा यामागे उद्देश आहे.
आता हे हॉस्पिटल हे आरोग्यसेवा क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू करताना नवीन जागेत स्थलांतरित झाले आहे. २०० खाटांची क्षमता असलेले, २४x७ आपत्कालीन सेवा, तज्ज्ञ डॉक्टरांची अनुभवी टीम, तसेच सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या व सुसज्ज ६ ऑपरेशन थिएटर्स, २ कॅथलॅब या रुग्णालयात उपलब्ध आहेत. या रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या सुविधा आहेत. उद्घाटन सोहळ्यास दुपारी चारला प्रारंभ होणार आहे. नाशिककरांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.