नाशिक : मुंबई महापालिकेतील सत्ताकारणाचा भाग म्हणून शिवसेनेला नाशिकच्या उपमहापौरपदाची बक्षिसी मिळाली आहे. नाशिक महापालिकेत स्पष्ट बहुमत असूनही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील चर्चेनंतर भाजपने शिवसेनेला सत्तेत सामावून घेण्याचा निर्णय घेतल्याने अधिकृत उमेदवारी मिळूनही भाजपच्या मच्छिंद्र सानप यांना उपमहापौरपदावर पाणी सोडावे लागले, तर ऐनवेळी सेनेच्या विलास शिंदे यांच्या गळ्यात उपमहापौरपदाची माळ पडली.
भाजपने महापौर-उपमहापौरपदाची उमेदवारी तीन दिवसांपूर्वीच जाहीर केली होती. महापौरपदासाठी हिमगौरी आहेर-आडके यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताना उपमहापौरपदासाठी माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे चिरंजीव, पंचवटीतील प्रभाग ३ मधील नगरसेवक मच्छिंद्र सानप यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु मुंबई महापालिकेतील पाठिंब्याच्या बदल्यात शिवसेनेने नाशिकमध्ये उपमहापौरपदाची मागणी केल्यानंतर भाजपने ती मान्य करावी लागली. फडणवीस, शिंदे यांच्यात गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या चर्चेअंती सेनेला सत्तेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापौरपदाच्या निवडीनंतर पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपमहापौरपदाची निवड प्रक्रिया राबविली. माघारीच्या मुदतीत भाजपच्या मच्छिंद्र सानप यांनी पक्षादेश पाळत अर्ज मागे घेतला. सेनेच्या प्रवीण तिदमे, राहुल दिवे यांनीही अर्ज मागे घेतल्याने एकमेव अर्ज शिल्लक राहिलेल्या विलास शिंदे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकारी प्रसाद यांनी जाहीर केले.
सेनेत नाराजीनाट्य
एकीकडे भाजप-सेनेत सत्ता सहभागावरून चर्चा सुरू असताना दुसरीकडे उपमहापौरपदाच्या उमेदवारीवरून शिवसेना (शिंदे गट) त वाद सुरू होता. उपमहापौरपदासाठी सेनेकडून महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, विलास शिंदे, राहुल दिवे यांनी अर्ज दाखल केला होता. विलास शिंदे यांना उपमहापौरपदाची उमेदवारी देण्यास तिदमे यांचा विरोध होता. त्यामुळे तिदमे समर्थक नगरसेवकांनी मंत्री दादा भुसे यांची मालेगावी भेट घेत नाराजीही मांडली होती. मात्र, उपनेते अजय बोरस्ते तथा गटनेते यांच्या पाठिंब्यामुळे विलास शिंदे यांचा उपमहापौरपदाचा मार्ग सुकर बनला. पक्षनेतृत्वाच्या आदेशानंतर तिदमे यांना सभागृहात आपला अर्ज मागे घ्यावा लागला. मात्र, सभागृहात पक्षाच्या नगरसेवकांच्या गटात न बसता स्वतंत्रपणे एकटे बसत तिदमे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
मच्छिंद्र सानप यांची उपमहापौरपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने गुरुवारी सायंकाळी भाजपने सर्व नगरसेवकांना व्हीप जारी करत सानप यांना मतदान करण्याचे आदेश दिले होते. सकाळी साडेनऊ वाजता सर्व नगरसेवक सहलीवरून महापालिकेच्या दिशेने निघाले होते. तोपर्यंत सानप यांचेच उपमहापौरपदासाठी नाव होते. यानंतर मुख्यमंत्र्यांकडून महाजन यांना युतीबाबत संदेश प्राप्त झाला. उपमहापौरपद सेनेला देण्यात आल्याचे कळविण्यात आल्यानंतर महाजन यांनी सेनेच्या विलास शिंदे यांना मतदान करण्याचे नवे व्हीप जारी करण्याच्या सूचना गटनेत्यांना दिल्या.