नाशिक

Nashik News | धान्यवाटप नाही, आठवडाभरापासून सर्व्हरचा अडथळा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शासनाच्या सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेअंतर्गत इंटरनेटच्या समस्येमुळे बायोमेट्रिक प्रणालीत अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून धान्य वितरण ठप्प झाले आहे. परिणामी, लाभार्थींमध्ये तीव्र रोष निर्माण झालेला आहे, तर वारंवारच्या समस्येमुळे हैराण झालेल्या रेशन दुकानदार आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

नाशिक जिल्ह्यात सुमारे आठ लाखांच्या आसपास रेशनकार्डधारक आहेत. यातील सुमारे दीड लाख कार्डधारक शहरातील असून उर्वरित ग्रामीण भागातील आहेत. यासर्व कार्डधारकांना महिन्याच्या १५ ते २५ तारखेदरम्यान, धान्य वाटप केले जाते. परंतु, गेल्या आठ दिवसांपासून ई-पॉस मशीनला सर्व्हरची अडचण येत आहे. त्यामुळे धान्य वितरण ठप्प झाले आहे.

समाजातील गोरगरीब जनतेला महिन्याकाठी रेशन दुकानांमधून गहू तसेच तांदूळ उपलब्ध करून देण्यात येते. धान्य वितरणामधील गळती थांबविण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक पद्धती लागू केलेली आहे. त्यामध्ये ई-पॉस मशीनवर अंगठा दिल्यानंतर लाभार्थींना त्यांच्या रेशनकार्डनुसार धान्य दिले जाते.

ई-पॉस मशीन्सला इंटरनेटअभावी रेंज उपलब्ध न होणे, सर्व्हर वारंवार डाउन असणे, इंटरनेट असल्यास धान्य वितरण पावती उशिरा प्रिंटिंग होणे किंवा लाभार्थींचा अंगठा मशीनवर देऊनही पुढची प्रक्रिया पार न पडणे अशा विविध अडचणी सध्या रेशन दुकानदारांना भेडसावत आहेत. त्यामुळे वेळेत धान्य उपलब्ध होत नसल्याने रेशनकार्ड लाभार्थींच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ दुकानदारांवर ओढवली आहे. यासर्व पार्श्वभूमीवर इंटरनेट व सर्व्हरचा तांत्रिक दोष तातडीने दूर करावा. अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रेशन दुकानदार संघटनांकडून देण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून ई-पॉस मशीनमध्ये सर्व्हरच्या समस्येमुळे रेशन वितरणात अडचणीत येत आहेत. त्यामुळे लाभार्थी आणि दुकानदारांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. शासनाने धान्य वितरण व्यवस्थेमधील तांत्रिक दोष तत्काळ दूर करावेत.
निवृत्ती कापसे, जिल्हाध्यक्ष, रेशन दुकान संघटना, नाशिक.
SCROLL FOR NEXT