नाशिक : शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी परिमंडळ दोनमध्ये कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवली.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर तसेच गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी शहरातील परिमंडळ दोनमध्ये सायंकाळी ७ ते रात्री १० दरम्यान, कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोध मोहीम घेत शस्त्र बाळगणाऱ्यांना पकडण्यात आले. तसेच तीन जणांनी पाेलिसांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार देवळाली कॅम्प येथे घडला.
मोहीमेनुसार अंबड, इंदिरानगर, सातपूर, नाशिक राेड, उपनगर व देवळाली कॅम्प पोलिस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोध मोहीम राबवली. त्यानुसार रेकॉर्डवरील १८४ गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली, तर ६३ तडीपार गुंडांची शोध मोहीम घेतली मात्र ते शहरात आढळले नाहीत. तसेच १२१ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली, तर गोवंश गुन्ह्यांमधील ३५ गुन्हेगारांची शोध मोहीम घेण्यात आली. दरम्यान, देवळाली कॅम्प येथील हाडोळा परिसरात शोध मोहीम सुरू असताना संशयित प्रशांत किशोर परदेशी, प्रेम उर्फ अन्नू किशोर परदेशी व सनी किशोर परदेशी (तिघे रा. हाडोळा) यांनी पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात तिघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.