नाशिक : जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साडीवाटप करण्यात येत असून, आतापर्यंत 10 तालुक्यांत 17 हजार 208 साड्यांचे वाटप झाले आहे, तर 15 तालुक्यांतील 1 लाख 76 हजार 924 लाडक्या बहिणींना साड्यावाटप करण्यासाठी पुरवठा विभागाकडे साड्या दाखल झाल्या आहेत.
जिल्ह्यात अंत्योदय योजनेतील सुमारे 1 लाख 76 हजार 924 पात्र महिला शिधापत्रिकाधारकांना साड्यावाटप करण्याचे नियोजन शासनाकडून करण्यात आले आहे. त्यानुसार प्रतिकुटुंब एक साडीवाटप करण्यात येत आहे. लाडक्या बहिणींना सणानिमित्त साडीचोळी वाटप करण्याचा रिवाज महायुती सरकारकडून सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 76 हजार 924 लाडक्या बहिणींना साडीवाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, दिंडोरी, नाशिक पुरवठा विभाग हद्द, मालेगाव, नांदगाव, निफाड, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या दहा तालुक्यांत साड्यांचे काही प्रमाणात वाटप सुरू करण्यात आले आहे. पुढील महिनाभर साड्यांचे वाटप सुरू राहणार आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या आदेशानुसार, राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी प्रतिकुटुंब एक साडी मोफत वितरित करण्याबाबतच्या कॅप्टिव्ह मार्केट योजनेस मान्यता देण्यात आली आहे. योजनेकरिता महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली असून, महामंडळाने सार्वजनिक वितरण व्यवस्था यंत्रणेकडील गोदामापर्यंत साड्यांचा पुरवठा केल्यानंतर तेथून अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबापर्यंत साडीवाटप करण्याची व त्यावर देखरेख करण्याची जबाबदारी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची राहणार आहे.
10 तालुक्यांतील अंत्योदय लाभार्थी
बागलाण - 4274
चांदवड - 536
दिंडोरी- 7478
धाविअ नाशिक - 4308
मालेगाव - 28
नांदगाव - 154
निफाड - 154
पेठ - 31
सुरगाणा - 102
त्र्यंबकेश्वर - 3
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत अंत्योदय योजनेच्या जिल्ह्यातील 21 ते 65 वयोगटातील सुमारे 1 लाख 76 हजार 924 पात्र महिलांना डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त साडी भेट देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने साडीवाटपचे नियोजन जिल्हा पुरवठा विभागाकडून सुरू आहे. रेशनदुकानांमार्फत प्रत्येक लाभार्थी कुटुंबास आजपासून एक साडी मोफत देण्यात येणार आहे.