येवला (नाशिक): संतोष घोडेराव
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शनिपटांगण आणि विंचूर चौफुली परिसरातील भव्य व्यापारी संकुलातील १०२ गाळ्यांसाठी आरक्षण सोडत नुकतीच पार पडली. मात्र, या गाळ्यांचा लिलाव कधी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर उभे असलेले हे व्यापारी संकुल गेल्या काही महिन्यांपासून लिलावाच्या प्रतीक्षेत आहे.
सुमारे ५० वर्षांपूर्वी नगरपालिकेने व्यावसायिकांना भाडे तत्त्वावर जागा उपलब्ध करून दिली होती. या जागांवर व्यावसायिकांनी पक्के बांधकाम केल्याच्या मुद्द्यावरून २००७ व २०१२ मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार सुमारे २०० गाळे जमीनदोस्त करण्यात आले होते. त्यानंतर नवनिर्माणाला वेळ लागला आणि संकुल पूर्ण होऊन अनेक वर्षे उलटून गेली, तरीही लिलाव न झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर अखेर आरक्षण सोडतीच्या माध्यमातून लिलाव प्रक्रिया पुढे नेण्यात आली.
सर्वे क्रमांक ३८०७ मध्ये बांधण्यात आलेल्या नवीन व्यापारी संकुलातील १०२ गाळ्यांपैकी २० गाळे विविध प्रवर्गांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. यामध्ये दिव्यांग, अनुसूचित जाती-जमाती, भटके-विमुक्त जाती, बेरोजगार सेवा संस्था व लोकसेवा केंद्र यांचा समावेश आहे. उर्वरित ८२ गाळे सर्वसाधारण नागरिकांसाठी असतील.
सोडत प्रक्रियेच्या वेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे व मुख्याधिकारी तुषार आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवन्या जाधव या मुलीच्या हस्ते चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. या प्रसंगी कर अधिकारी रोहित पगार यांनी प्रास्ताविक करत माहिती दिली. उपमुख्यधिकारी चंद्रकांत भोये, सहाय्यक कर निरीक्षक काकासाहेब शिरसाठ, भांडारपाल दीपक जावळे, याचिकाकर्ते दीपक पाटोदकर, माजी नगरसेवक प्रमोद सस्कर, योगेश सोनवणे, नितीन काबरा, अतुल घटे, नानासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्के गाळे (५ गाळे) : गाळा क्र. २८, ३४, २३, ९ व ३८ (तळमजला).
अनुसूचित जाती-जमाती व भटके-विमुक्त प्रवर्गासाठी राखीव ५ टक्के गाळे (५ गाळे) : गाळा क्र. १६, १४ (तळमजला), ११, २९ (पहिला मजला), ४ (दुसरा मजला).
बेरोजगार सेवा सहकारी संस्था व लोकसेवा केंद्रासाठी राखीव १० गाळे : गाळा क्र. २, ८, ७, ३७ (तळमजला), १, २, १९, २१ (पहिला मजला), १, ५ (दुसरा मजला).
पुढील दीड ते दोन महिन्यात या गाळ्याची लिलाव प्रक्रिया होणार आहे. ई लिलाव पद्धत यासाठी वापरली जाणार असल्याचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी सांगितले. दरम्यान ही पद्धत किचकट असल्याने खुल्या पद्धतीने लिलाव करावे, अशी मागणी यावेळी नागरिकांनी नगरपालिकेकडे केली आहे.