नाशिक

Nashik news | रामतीर्थावर हायव्होल्टेज ड्रामा!

अतिक्रमण निर्मूलन विरुद्ध पांडेचा कडवा विरोध; परिसरात तणाव

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील महत्त्वाकांक्षी रामकुंड पथ प्रकल्प व चौक सुशोभीकरणासाठी अडथळा ठरणारे रामतीर्थ परिसरातील 'पांडे मिठाई' हे दुकान मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून शुक्रवारी (दि. २०) बुलडोझरद्वारे जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ परिसरातील रस्ते प्रशस्त करणे आणि चौकाचे सुशोभीकरण करणे या प्रकल्पाला गती देण्यासाठी मनपाच्या अतिक्रमण विभागाने मोठ्या फौजफाट्यासह रामतीर्थ परिसरात कारवाई सुरू केली. अपेक्षेप्रमाणे, सुमारे १५० वर्षांचा वारसा असलेल्या पांडे मिठाईच्या संचालिका कल्पना पांडे यांनी ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे आरोप करत विरोध दर्शविला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या म्हणण्यानुसार, पांडे मिठाईला पूर्वीच नोटीस देऊन जागा खाली करण्यास सांगण्यात आले होते. तसेच अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला होता. मात्र संबंधितांनी जागा खाली न केल्याने अतिक्रमण निर्मूलन पथकाने सुमारे ११.४५ च्या सुमारास कारवाई सुरू केली. जवळपास दोन तासांत बुलडोझरच्या साहाय्याने संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.

कारवाईदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रामतीर्थ चौकाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते. कारवाई सुरू होताच काही दुकानदारांनी विरोध केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी विरोध करणाऱ्या महिलांना बाजूला नेले. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू ठेवण्यात आली.

या कारवाईवेळी अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे, सहायक उपायुक्त मदन हरिश्चंद्र, डॉ. प्रज्ञा त्रिभुवन, राजाराम जाधव, पंचवटी विभागीय अधिकारी राहुल जाधव, पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे, सातपूर विभागीय अधिकारी कैलास आहेर, उपअभियंता जे. बी. राऊत तसेच कनिष्ठ अभियंते संतोष जोपळे, भूषण देशमुख, मिलिंद जाधव आणि अमित पवार उपस्थित होते. तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, अभिजित पैठणकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

"ही आमची खासगी मालकीची जागा असून, आमचे राहते घर व मिठाई भंडार हेच उदरनिर्वाहाचे साधन आहे. सुमारे १५० वर्षांचा याला वारसा आहे. २०१७ च्या डीपी प्लॅनमध्ये चौक सुशोभीकरणाची कोणतीही तरतूद नाही. या विरोधात आम्ही न्यायालयात गेलो आहोत. ही कारवाई बेकायदेशीर आहे."
- कल्पना पांडे, संचालिका, पांडे मिठाई
"सदर भूखंड आरक्षित नसताना मनपा बेकायदेशीर व बळजबरीने ही कारवाई करत आहे. या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली असून, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अशी कारवाई करणे अनुचित आहे."
- ॲड. सुनील आहुजा, वकील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT