मातीच्या ढिगार्‍यासह कोसळलेला स्वयंपाक घराचा भाग (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Nashik News | काझी गढी पुन्हा ढासळली

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जुन्या नाशकातील काझी गढी पुन्हा ढासळल्याने येथील 5 रहिवाशी कुटूंबांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. रहिवाशी मृत्यूच्या छायेत वावरत असल्याने त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसली तरी धोका अद्यापही कायम आहे.

काझी गढीचा काही भाग शनिवारी (दि.14) सकाळी सव्वाबाराच्या दरम्यान ढासाळला. यामुळे 5 कुटूंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. काझीगढीच्या बाजूने असलेल्या तीन घरांची भिंत कोसळून तीन रुम पूर्णपणे मातीसह ढिगार्‍यात दाबले गेले. चौथ्या घराची भिंत तर पाचव्या घराच्या भिंतीचा काही भाग कोसळला. यामध्ये स्वयंपाकघर, जीवनोपयोगी वस्तु, घरावरील पत्रे, घरातील सामानाचे नुकसान झाले.

काझीगढीचा भाग कोसळल्याने उघड्यावर आलेला संसार.

नुकसानग्रस्त घरांमध्ये लिलाबाई हरी परदेशी, गुलाब बिंद्रावन परदेशी, अलका नंदु साळुंखे, राधाबाई रंगसिंगे, गायत्री नवनाथ तारु, संतोष वाघ हे राहतात. भिंत कोसळल्यानंतर परिसरातील रहिवाशांनी नुकसानग्रस्तांना मदत करीत घरातील सर्व सामान बाहेर काढले. काझी गढीच्या पायथ्याशी गाई, म्हशींचा गोठा असून या गोठ्याला धोका कायम आहे. नागरिकांनी काझी गढीच्या पायथ्याशी असलेली जमीन समतल करुन महापालिकेने याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी निवासी व्यवस्था करुन द्यावी, अशी मागणी केली आहे.

अडीच वर्षापर्वी काझी गढी कोसळल्यानंतर येथे संरक्षक भिंत बांधण्याचा विचार पुढे आला होता. यावेळी दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला भिंत बांधण्याचे आदेश दिले होते. मात्र हा भाग महापालिकेच्या अखत्यारीत येतो असे सांगून सार्वजनिक बांधकाम विभागाने हात झटकले होते. महापालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यातील टोलवाटोलवीमुळे संरक्षक भिंत बांधण्याचा विचार मागे पडला. तेव्हापासून काझीगढीच्या भिंतीचा प्रश्न कायम आहे.

तत्कालीन आमदारांनी काझीगढीची पाहणी करुन येथे संरक्षक भिंत बांधण्याचे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात भिंत कधीही अस्तित्वात आली नाही. रात्री अपरात्री दुर्दैवी घटना घडल्यास मोठी हानी होईल.
विकी परदेशी, रहिवाशी, काझीगढी, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT