नाशिक : कोरोना प्रादुर्भाव सुरु असताना कचरा उचलण्यास नकार देत मनपा स्वच्छता निरीक्षकास शिवीगाळ करीत धमकावल्याप्रकरणी घंटागाडीवर काम करणाऱ्या सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होता. त्यापैकी पाच जणांना बेकायदेशीर जमावाचा घटक असल्याप्रकरणी न्यायालयाने कोर्ट उठेपर्यंत शिक्षा दिली, तसेच प्रत्येकी ३ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. (A case has been registered against six contract workers working on the Ghantagadi)
दीपक रामदास चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, ३१ जुलै २०२० रोजी सकाळी सात वाजता तपोवन येथील मनपा जलशुद्धीकरण प्रकल्पावर ही घटना घडली होती. २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असताना कंत्राटी कर्मचारी महादेव दगुजी खुडे (रा. जेलरोड), विठ्ठल नामदेव शिंदे (रा. ध्रुवनगर), जयेंद्र दगडु पाडमुख (रा. आडगाव), सुभाष संभाजी गवारे (रा. खडकाळी), नितीन बाळू शिराळ (रा. गंगापूर) व शिवनाथ जाधव (रा. गंगापूर गाव) यांनी चव्हाण यांना शिवीगाळ, धमकावत काम करण्यास नकार दिला. याप्रकरणी सहा जणांविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, गैरकायद्याची मंडळी गोळा करणे, आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शिवनाथ जाधव मयत झालेले आहेत.
तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संजय बिडगर यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. अपर्णा पाटील व बगदाणे यांनी युक्तीवाद केला. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. बदर यांनी पाच जणांना बेकायदेशीर जमावाचा घटक असल्याप्रकरणी कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व प्रत्येकी ३ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार प्रेरणा अंबादे, सोमनाथ शिंदे, आर. एन. शेख यांनी कामकाज पाहिले.