The sowing of corruption boost to crime
The sowing of corruption boost to crime file photo
नाशिक

Nashik News | राज्यातील कारागृह फुल्ल; गुन्हेगारीस 'बूस्ट'

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : राज्यातील मध्यवर्ती, जिल्हा, विशेष, खुल्या कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. नाशिक मध्यवर्ती कारागृह वगळता हे चित्र सर्वत्र आहे. परिणामी, कारागृहांत नामचीन 'मार्गदर्शक' भेटून, या संगतीतून गुन्हेगार अधिक सराईत होत आहेत. त्यात शासकीय यंत्रणेतील काही अधिकारी, कर्मचारी ही गुन्हेगारांशी 'अर्थ'पूर्ण संबंध ठेवत असल्याचे प्रकार उघडकीस येतात तशा चर्चाही रंगत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना वळण लावण्यासाठी कारागृहे आहेत की, सराईत घडविणारी केंद्रे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी हा गंभीर प्रश्न झालेला असून, त्यातून गुन्हेगारी वाढत असून शासकीय यंत्रणांमधील काही भ्रष्टाचारी अधिकारी-कर्मचारीही गुन्हेगारांना खतपाणी घालात असल्याचे चित्र आहे.

राज्यात नऊ मध्यवर्ती कारागृहे, २९ जिल्हा कारागृहे, विशेष कारागृहे, महिला कारागृह व किशाेर सुधारालय असे प्रत्येकी १-१ तसेच १९ खुले कारागृह व एक खुली वसाहत असे ६० कारागृहे उभारण्यात आली आहेत. त्यात २७ हजार ११० कैदी ठेवण्याची क्षमता असताना, प्रत्यक्षात ४० हजार ४२८ कैदी कारागृहांमध्ये आहेत.

भ्रष्टाचाराच्या पेरणीमुळे गुन्हेगारीला मिळतेय खतपाणी

गत आठवड्यात जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याने दुसऱ्या कैद्याचा खून केल्याची घटना घडली. मारेकऱ्याने धारदार हत्याराने हा खून केल्याने मारेकऱ्याकडे शस्त्र कसे आले हा प्रश्न निर्माण झाला. याप्रकरणी काही पोलिसांना निलंबित केले, तर काहींची चौकशी सुरू झाली आहे. तसेच नाशिक मध्यवर्ती कारागृहात रविवारी (दि. १४) शिक्षा बंद्यास सोडण्यासाठी 'फिट फॉर फिटनेस' प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आबिद अत्तार व वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. काही दिवसांपूर्वी नाशिक रोड कारागृहात उपचार करत नसल्याचा आरोप करीत कैद्याने स्वत:ला दुखापत करून जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याची घटना घडली होती. त्याचप्रमाणे कारागृहांमध्ये कैद्यांकडे मोबाइल, अमली पदार्थ सापडणे असे प्रकार राज्यातील कारागृहांमध्ये घडले आहेत. पुणे येथे एमडी प्रकरणात अटकेत असलेला ललित पानपाटील हा उपचाराच्या बहाण्याने ससून रुग्णालयाऐवजी ऐशोआरामात हॉटेलमध्ये राहात असल्याचे उघड झाले. तसेच कारागृहातील गुन्हेगारांच्या सानिध्यात राहून इतर गुन्हेगारांनी बाहेर येऊन दरोडा, घरफोडी, जबरी चोरी, खून असे गंभीर गुन्हे केल्याचे तसेच टोळ्या करून दहशत पसरवल्याचे प्रकार घडले आहेत.

SCROLL FOR NEXT