नाशिक महापालिकेसह विविध शासकीय विभागांकडून तयार करण्यात आलेल्या सिंहस्थ आराखड्याविषयी आढावा बैठक  Pudhari News network
नाशिक

Nashik News | पंतप्रधान कार्यालयाकडून आज सिंहस्थ आढावा

सचिव तरुण कपूर घेणार व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : अवघ्या दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आराखड्याला अद्यापही मंजूरी मिळाली नसल्यामुळे सिंहस्थ कामांना मुहूर्त लाभत नसताना आता थेट पंतप्रधान कार्यालयाने नाशिकच्या सिंहस्थ कामांकडे लक्ष पुरविले आहे. पंतप्रधान कार्यालयातील सचिव तरुण कपूर यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.१६) दुपारी ४ दरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सिंहस्थ आढावा बैठक होत आहे.

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एकत्रितरित्या १५ हजार कोटींचा सिंहस्थ आराखडा तयार करण्यात आला आहे. सिंहस्थ कामांसाठी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत बैठकांवर बैठका होत आहेत. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही सिंहस्थासाठी स्वतंत्र बैठका आयोजित करत आढावा घेतला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी देखील सिंहस्थासाठी विशेष बैठका घेत आश्वासने दिली. परंतु अद्यापही सिंहस्थ आराखडा मंजूर होऊ शकलेला नाही. बुधवारी पंतप्रधान कार्यालयाचे सचिव तरुण कपूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीला राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्यासह स्थानिक पातळीवर अधिकारी ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.

सिंहस्थ कामांबाबत संभ्रम

एकीकडे मंत्र्यांकडून सिंहस्थ कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या जात असताना आराखडाच मंजूर नसल्यामुळे कामे करायची कोणती, असा सवाल शासकीय यंत्रणांपुढे उभा ठाकला आहे. सातत्याने होणाऱ्या बैठकांना आता अधिकारी देखील वैतागले आहेत. अशातच पंतप्रधान कार्यालयाने देखील कुंभमेळ्याचे नियोजनाच्या दृष्टिकोनातून लक्ष घातले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT