नाशिक : शहरात टवाळखोरांचे वाढते प्रकार रोखण्यासाठी उपनगर पोलिसांनी सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या १०२ टवाळखोरांवर कायदेशीर कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान उपनगर पोलिस ठाण्यात प्रत्यक्षात टवाळखोरांची शाळा भरवून त्यांना कडक समज देण्यात आली.
नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत टवाळखोरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी टवाळखोरांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त किशोर काळे, सहायक पोलिस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई राबवण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ, पोलिस निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनीट १, युनीट २, युनीट ४, पीसीबी पथक, गुंडापथक, सायबरपथक, विशेष शाखा तसेच परिमंडळ २ अंतर्गत पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. १२ डिसेंबरला सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड, गोंधळ घालून शांततेचा भंग करणारे १०२ टवाळखोर आढळले. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ११२ व ११७ अंतर्गत कारवाई करण्यात आली. या टवाळखोरांना पोलिस ठाण्यात बोलावत योग्य सूचना दिल्या. भविष्यात असे कृत्य केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला. या कारवाईमुळे उपनगर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.