मखमलाबादमधील शेतकरी आता द्राक्षबागांबरोबरच पेरूच्या उत्पादनाकडे वळला आहे (छाया : नेमिनाथ जाधव)
नाशिक

Nashik News | पेरूचे गाव म्हणजे मखमलाबाद; गोड बागा मोहरल्या

पुढारी वृत्तसेवा

मखमलाबाद : नेमिनाथ जाधव

गावठी पेरू तसेच अन्य जातीच्या पेरूंसाठी प्रसिद्ध असलेल्या मखमलाबादमधील शेतकरी आता द्राक्षबागांबरोबरच पेरूच्या उत्पादनाकडे वळला आहे. विविध प्रकारची आधुनिक प्रकारची रोपे निघाल्याने शेतकऱ्यांना सोयीस्कर व परवडणारी रोपे मिळत असल्याने मखलमाबाद आता पेरूचे गाव म्हणून उदयास आले आहे.

पेरूचे झाड हे मूळतः उष्णकटिबंधीय असून, पेरूची लागवड प्रामुख्याने वेगवेगळ्या हवामानात केली जाते. कोरड्या व उष्ण तपमान असलेल्या प्रदेशात तसेच हिवाळ्यात अधिक थंडी असलेल्या ठिकाणी फळाची गुणवत्ता चांगली राहते. किमान 10 ते ४५ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या प्रदेशातच हे पीक चांगले येते. हे झाड मुळातच काटक असल्याने पाण्याचा ताण पडला, तरीही ते तग धरू शकते. त्यामुळे दुष्काळी भागात काही काळ पाणीटंचाई निर्माण झाली, तरीही बाग तग धरू शकते. मखमलाबाद परिसरात पेरूसाठी योग्य हवामान असल्याने द्राक्षबागांबरोबरच पेरूच्या बागाही फुलल्या आहेत. एकट्या मखमलाबाद परिसरात सुमारे 400 हेक्टरवर पेरूच्या बागा फुलल्या आहेत.

आधुनिक पेरूच्या पिंक तैवान या पेरूच्या लागवडीसाठी नऊ बाय पाच अंतरावर झाडे लावण्यात येत असून, या पेरूच्या बागेत अँगल कीपिंग तार, बांबू आदीसह खर्च करावा लागतो. तसेच मजुरांना ३०० रुपये रोज देऊन खुडणीसाठी आणावे लागते. पेरूच्या पिंक तैवान या जातीच्या पेरूसाठी सध्या ६० ते ७० रुपये किलोने बाजारभाव मिळत आहे. हे पेरू पंजाब, गुजरात, दिल्ली आदी राज्यांत पाठवले जातात.

पेरूच्या सरदार उर्फ लखनऊ ४९, तसेच लखनऊ ४६, नाशिक किंवा मखमलाबादी पेरू, धारवाड, अलाहाबाद सफेदा, चित्तीदार, करेला, धोलका, कोथरूड अशा जाती असून, मखमलाबादमधील पेरूचा गर हा गोडसर आणि लुसलुशीत असल्याने संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. गोडसर गरामुळे अन्नप्रक्रिया कंपन्यांची मखमलाबाद पेरूला पसंती आहे.

पेरूच्या पिंक तैवान या जातीच्या पेरूसाठी सध्या ६० ते ७०रुपये किलोने बाजार भाव मिळत आहे सदरचे पेरू हे पंजाब, गुजरात, दिल्ली आदीसह विविध राज्यात पाठवले जात आहेत.

पेरूचे झाड कमी पाण्यावर येणारे कणखर व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असल्यामुळे या फळ पिकाचे लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. उत्पादन व लागवड या दृष्टीने विचार केल्यास फळझाडांमध्ये पेरूचा चौथा क्रमांक लागतो. भारतामध्ये पेरूच्या लागवडीखालील एकूण क्षेत्र ६० हजार हेक्टर असून, महाराष्ट्रामध्ये १२,२६० हेक्टर क्षेत्र पेरू लागवडीखाली आहे. नाशिक, पुणे, सातारा, नगर व औरंगाबाद या जिल्ह्यांत पेरूची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. पेरूचे सरासरी उत्पादन हेक्टरी साधारणपणे १२ ते १६ टन असून भारतामध्ये या फळाचे उत्पादन एकूण ७० हजार ६,११० मेट्रिक टन एवढे आहे.

जाम जेली, सरबतासाठी वापर

पेरूमध्ये लिंबूवर्गीय फळापेक्षा तिप्पट प्रमाणात क जीवनसत्त्व असते. सर्वसाधारण 100 ग्रॅम फळापासून १००-२६० मि.ग (क) जीवनसत्त्व पुरवले जाते. ताज्या फळाप्रमाणेच त्याच्या घरापासून तयार केलेले जाम जेली, नेक्टर, आइस्क्रीम पावडर, सरबत अतिशय लोकप्रिय उत्पादने आहेत. सॅलड व पुडिंगमध्ये पेरूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

पेरूला फम, प्लास्टिक पिशवी यांचे आच्छादन करावे लागते. एका फळाला ६० पैशाचे फम तसेच ६० रुपये किलोने प्लास्टिकची पिशवी खरेदी करावी लागते. एक किलो पेरूसाठी २५ रुपये किलोचा खर्च येतो. भांडवल सोडून खर्च तसेच कीटकनाशक फवारणी करावी लागते. यामुळे शेतकऱ्यांना पीक घेणे सध्या आव्हानात्मक झाले आहे.
घनश्याम तिडके, पेरू उत्पादक, मखमलाबाद, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT