नाशिक : दिलीप सूर्यवंशी
महिला व बालविकास विभाग केंद्र सरकार पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्राद्वारे आतापर्यंत एकूण 947 संकटग्रस्त महिलांना मदत करण्यात आली आहे. सखी वन स्टॉप सेंटरमध्ये नोंदणी करण्यात आलेल्या पीडितांचा वेळोवेळी पाठपुरावा केला जात असून त्यांच्या आवश्यकतेनूसार 147 पीडीत महिलांचे इतर जिल्ह्यात तर 77 पीडीत महिलांचे इतर राज्यात पुनर्वसन करण्यात आले आहे.
सखी वन स्टॉप सेंटरची उद्दिष्टे :
पीडितांना तात्काळ मदत : हिंसाचारग्रस्त महिलांना एकाच ठिकाणी वैद्यकीय, कायदेशीर, मानसोपचार व पुनर्वसनाच्या सेवा पुरवणे.
कायदेशीर मदत : पीडित महिलांना मोफत कायदेशीर सल्ला व आवश्यकतेनुसार संरक्षण देणे.
मानसिक आधार : महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन व भावनिक आधार.
आश्रय : तात्पुरती सुरक्षित निवासाची सोय.
पोलिस मदत: गरजेनुसार पोलिसांशी त्वरित संपर्क.
सखी वन स्टॉप सेंटर ही भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली योजना आहे. सेंटरचे उद्दिष्ट महिलांवर होणार्या हिंसाचाराच्या घटना रोखणे व पीडित महिलांना त्वरित मदत पुरवणे आहे हे आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै 2017 पासून शासकीय वात्सल्य महिला वसतिगृह, महिला व बालविकास केंद्र, नाशिक येथे तात्पुरत्या स्वरुपात कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली 11 डिसेंबर 2011 रोजी वन स्टॉप सेंटरच्या कायमस्वरुपी शासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
वन स्टॉप सेंटरच्या मार्गदर्शक तत्वांनुसार जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली 17 जुलै 2017 रोजी व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली. मानधन तत्वावर सेंटरमध्ये केंद्र व्यवस्थापक, केस वर्कर, कायदेशीर सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, आय.टी. स्टाफ, बहुउद्देशीय कर्मचारी, सुरक्षारक्षक आदी 13 कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. वन स्टॉप सेंटरच्या मार्गदर्शिकेनुसार केंद्राचे दैनंदिन कामकाज चालू आहे.
वन स्टॉप सेंटरचे जिल्हाधिकारी यांच्या नावे बँकेत खाते उघडण्यात आले असून केंद्र शासनाकडून सेंटरसाठी लागणारे अनुदान वेळोवेळी खात्यावर प्राप्त होत असते. अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने प्राप्त अनुदान हे वन स्टॉप सेंटरसाठी लागणार्या आवश्यक गोष्टींसाठी खर्च केले जाते. केलेल्या खर्चाचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने केंद्र शासनास नियमित सादर करण्यात येतो.
घरगुती हिंसाचार, लैंगिक छळ, बलात्कार, अॅसिड हल्ला यांसारख्या घटनांचा सामना करणार्या महिला. आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या कोणत्याही वयोगटातील महिला.
प्रत्येक जिल्ह्यात सखी वन स्टॉप सेंटर कार्यरत आहेत. महिला हेल्पलाईन : 181 वर संपर्क साधून सखी केंद्राची माहिती मिळू शकते.
सखी वन स्टॉप सेंटरद्वारे संकटग्रस्त, अत्याचारग्रस्त महिलांना मदत केली जाते. कुठल्याही महिलेने केव्हाही फोन केला तरी तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यात येते. महिलांनी निर्भयपणे सखी वन स्टॉप सेंटरशी संपर्क साधावा. महिलांना तात्पुरत्या निवार्यापासून, पोलिस सहाय्य आणि कायदेशीर मदत त्वरित उपलब्ध करून देण्यात येईल.सुनील दुसाने, महिला व बालविकास अधिकारी, नाशिक