अवयवदान Pudhari News Network
नाशिक

Nashik News | अवयवदानाचा वाढेना टक्का, रुग्णांना धक्का!

जनजागृतीचा अभाव : दहा लाख लोकसंख्येमागे केवळ 0.80 टक्केच अवयवदान

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सतीश डोंगरे

शासन स्तरापासून ते स्वयंसेवी संस्थांपर्यंत 'अवयवदान चळवळ' प्रभावीपणे राबविली जात असल्याचा दावा केला जात असला तरी, प्रत्यक्षात चळवळीतून अवयवदान किती होते हा चिंताजनक प्रश्न आहे.

देशात दरवर्षी पाच लाखांपेक्षा अधिक रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची गरज आहे. प्रत्यक्षात देशात केवळ ०.८० टक्केच अवयवदान होत असल्याने, कित्येकांना अवयवांअभावी आपला जीव गमवावा लागत असल्याची विदारक स्थिती आहे.

बदलेल्या जीवन पद्धतीचा विपरीत परिणाम आरोग्यावर होत असल्याने, अवयव निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे. नॅशनल हेल्थ पोर्टलनुसार, देशात दरवर्षी अवयव निकामी झाल्याने, पाच लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू होतो. त्यात दोन लाख रुग्णांचा मृत्यू यकृत निकामी झाल्याने होतो. पाश्चात्य देशांचा विचार केल्यास, अवयवांअभावी मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. भारतात रुढी, परंपरा, गैरसमजुतींमुळे अवयवदानांसाठी पुढे येणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे. एका संकेतस्थळानुसार, सद्यस्थितीत देशात एक लाख तीन हजार २२३ पुरुष, महिला आणि लहान मुले अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. रुग्णांचा हा आकडा वाढतच असून, अवयव दात्यांचे प्रमाण दहा लाख लोकसंख्येमागे अवघे ०.८० टक्के इतके असल्याने, चळवळ अधिक व्यापकपणे राबविण्याची गरज आहे.

राज्यातील अवयव प्रत्यारोपण

राज्यात 284 अवयव प्रत्यारोपण केंद्र

राज्यात डिसेंबर, २०२४ अखेर २८४ अवयव प्रत्यारोपण केंद्रांची नोंदणी करण्यात आली असून, त्यापैकी १३२ केंद्रे एका प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणासाठी आहेत. तसेच ६७ केंद्रांची नोंदणी प्रत्यारोपणाशिवाय अवयव काढण्याचे केंद्र म्हणून झाली आहे. या व्यतिरिक्त नेत्रदान, नेत्रपेढी व बुबुळ प्रत्यारोपणासाठी एकूण ३१७ केंद्रे आहेत.

पाश्चात्य देशातील स्थिती

पाश्चात्य देशात अवयवदानाबाबत व्यापक जनजागृती केली जात असल्याचे दिसून येत आहे. प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे स्पेनमध्ये ४९ आणि अमेरिकेत ३० टक्के अवयवदान केले जाते. तुलनेत भारतात हे प्रमाण मागील काही वर्षांपर्यंत ०.५० टक्के इतके होते. अलीकडे त्यात वाढ होऊन ०.८० टक्क्यांंवर आले. भारतात केवळ ३ टक्के नोंदणीकृत अवयव दाते आहेत. देशात तामिळनाडूमध्ये सर्वाधिक १.८ टक्के अवयवदान केले जाते.

41 टक्के नातेवाइकांचा नकार

आपल्या नात्यातील रुग्णाला अवयव देण्यासाठी २०१३ पर्यंत ३२ टक्के नातेवाइकांची सहमती होती. आता हे प्रमाण ५९ टक्क्यांवर गेले आहे. मात्र, अजूनही ४१ टक्के नातेवाइकांचा अवयवदानास नकार आहे. ५९ टक्क्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अधिक आहे.

दररोज 17 रुग्णांचा मृत्यू

अवयवांअभावी देशात दररोज १७ रुग्णांचा मृत्यू होतो. देशात मेंदूमृत झालेल्या रुग्णांमध्ये अवयवदानाचे प्रमाण १० लाख लोकांमागे केवळ ०.३४ टक्के इतके आहे. अवयव प्रत्यारोपणासाठी दर आठ मिनिटाला एका रुग्णाची अवयव प्रत्यारोपणाची यादीत नोंद होते.

1200 मुले अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत

१८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील बाराशेपेक्षा अधिक मुले अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. मागील वर्षी १९०० मुलांवर अवयव प्रत्यारोपण केले गेले. २०२४ मध्ये ८८० बाल अवयव दाते हाेते. यामध्ये सर्वाधिक ११ ते १७ वयोगटांतील होते. तर ११० अवयव दाते १२ महिन्यांपेक्षा कमी वयाचे होते. ११ ते १७ वयोगटांतील बहुतेक मुले मूत्रपिंडाने ग्रस्त होते. त्यानंतर हृदयाच्या आजाराने असल्याची नोंद आहे.

घरबसल्या करा अवयवदान

कोणताही सदृढ व्यक्ती अवयवदान करू शकतो. हायटेक युगात घरी बसून अवयवदान करता येते. पैसे देण्यासाठी मोबाइलवरून आपण जसा कोड स्कॅन करतो, तसा कोड स्कॅन करून अवयवदानाचा अर्ज लगेच मिळविता येतो. अवयव प्रत्यारोपण समितीने ही सुविधा उपलब्ध करून दिली असून, अॅपच्या माध्यमातून अवयवदान करणे सोपे झाले आहे.

मुंबईमध्ये सर्वाधिक प्रत्यारोपण

१९९७ ते ४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मुंबईत ११५७ किडनी प्रत्यारोपण, २१८ हृदय, ५६१ यकृत आणि ५३ फुप्फुस प्रत्यारोपण करण्यात आले आहे. ७२४ दात्यांनी अवयवदान केले आहे.

जीवंतपणी मूत्रपिंडदान करता येत असल्याने, ते मिळते. मरणोत्त्तर नेत्रदानाचे प्रमाणही ठीक आहे. मात्र, यकृत, हृदय, फुप्फुसे या अवयवांचे प्रमाण कमी आहे. सरकारी अवयदान सेंटरमध्ये दात्यांची नोंद करणे आवश्यक आहे. यासह अवयव प्रत्यारोपणाचा खर्चही देशात मोठा आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये ही सुविधा नाही. या सर्व उणीवा दूर होणे गरजेचे आहे.
डॉ. सुधीर संकलेचा, माजी अध्यक्ष, आयएमए, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT