नाशिक

Nashik News | देवळा तालुक्यात वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने कांद्याचे शेड कोसळले, डाळिंब पिकाचेही नुकसान

गणेश सोनवणे

देवळा ; पुढारी वृत्तसेवा- देवळा तालुक्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील डाळींब पिकासह व्यापाऱ्यांच्या कांद्याचे शेड पडून कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अनेक झाडे रस्त्यावर उन्मळून पडले आहेत. तसेच विजेचे खांब पडल्याने तालुक्यातील शहरासह १६ ते १७ तास वीज पुरवठा खंडीत झाला.

सोमवार दि.१३ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास प्रचंड वेगाने वाहणारे वारे सुरू झाले. देवळा शहरासह तालुक्यात एक तास मुसळधार पाऊस होऊन शहरालगत असलेल्या कांदा व्यापाऱ्यांचे साठवणूकीचे शेड कोसळून जवळपास एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यात उन्मळून पडलेल्या कांदा शेडचे बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, संचालक भाऊसाहेब पगार आदींनी पाहणी केली.

बाजार समिती जवळील भूषण ठुबे या व्यापाऱ्यांचे सात लाखाचे शेड कोसळले असून शेजारील शेड मध्ये असलेला ७० ते ८० क्विंटल कांदा पाणी घुसल्याने दीडशे फूट अंतरावर वाहून गेला आहे. त्याचे अंदाजे १४ लाखाचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे वाजगाव रोड वरील पंकज अलई या व्यापाऱ्यांचे दोन्ही शेड जमीनदोस्त झाल्याने संपूर्ण कांदा भिजला आहे . तर तहसील कार्यालय जवळील शुभम देवरे या व्यापाऱ्यांचे चारही शेड कोसळल्याने १ हजार क्विंटल कांद्याचे पावसात भिजून नुकसान झाले अंदाजे शेड व कांदा मिळवून ४८ लाखाचे नुकसान झाले.

तालुक्यातील विठेवाडी येथील रमेश पुजारांम निकम व देवळा येथील प्रकाश आहेर या शेतकऱ्यांचे डाळींब बागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच वाजगाव येथील काही शेतकऱ्यांच्या डाळींब बागा उद्वस्थ झाल्या तर काहींचे कांद्या साठवणूकीचे शेड कोलमडून पडले आहेत. महसूल प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करण्यात आला आहे .
अवकाळी व वादळी वाऱ्यामुळे देवळा शहर व परिसरात १८ ते २० तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक नागरिक त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT