Godavari River stock image 
नाशिक

Nashik News : गोदाप्रदूषण प्रकरणी ‘या’ ग्रामपंचायतीला बजावणार नोटीस

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– गोदावरी नदी प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेच्या माध्यमातून 'नमामि गोदे'सह शेकडो कोटींचे प्रकल्प राबविले जात असताना चांदशी गावातून सांडपाण्याचा नाला थेट गोदापात्रात सोडण्यात आल्याचे मलनिस्सारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत समोर आले आहे. गोदा प्रदूषणमुक्तीच्या मनपाच्या प्रयत्नांना यामुळे खो घातला जात असल्यामुळे चांदशी ग्रामपंचायतीला नोटीस बजावण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण चिंतेचा विषय बनले आहे. नदीप्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीपात्रात सोडणे महापालिकेवर बंधनकारक आहे. महापालिकेने जलसंपदा विभागासमवेत केलेल्या करारात तशी प्रमुख अटच आहे. यासाठी महापालिकेने सहा सिव्हरेज झोन तयार केले असून, तपोवन येथे १३० एमएलडी, आगरटाकळी येथे ११० एमएलडी, चेहेडी येथे ४२ एमएलडी तसेच पंचक येथे ६०.५ एमएलडी अशाप्रकारे ३४२.६० एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण केंद्र उभारले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालीन नियमांनुसार ३० बीओटी क्षमतेनुसार या मलनिस्सारण केंद्रांची उभारणी झाली होती. बदलत्या काळात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने जलप्रदूषणासंदर्भात नियमावली अधिक कठोर केली. त्यानुसार मलनिस्सारण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या प्रक्रियायुक्त सांडपाण्याची मर्यादा १० बीओटीच्या आतच असावी, असा दंडक घातला. त्यामुळे महापालिकेने ३० बीओटी क्षमतेनुसार उभारलेली मलनिस्सारणे केंद्रे कालबाह्य ठरली. त्यातच शहराच्या वाढत्या विस्तार आणि वाढत्या लोकसंख्येमुळे ही मलनिस्सारण केंद्रे अपुरी पडत असल्यामुळे या केंद्रांचे आधुनिकीकरण आणि क्षमतावाढ करण्याची योजना महापालिकेने हाती घेतली.

त्याचबरोबर २७८० कोटींचा नमामि गोदा प्रकल्पदेखील राबविला जात आहे. गोदा प्रदूषणमुक्तीसाठी पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालनही महापालिकेला करावे लागत आहे. त्यावर शेकडो कोटींचा खर्च होत असताना महापालिका हद्दीलगतच्या ग्रामपंचायतींमधून प्रक्रिया न करताच सांडपाणी नदीपात्रात सोडले जात असल्याचे आढळून आले आहे.

महापालिकेने केलेल्या पाहणीत चांदशी गावातून थेट नदीपात्रात सांडपाण्याच्या गटारी सोडण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे चांदशी ग्रामपंचायतीला नोटीस बजावण्यात येणार आहे.

– संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता, मलनिस्सारण

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT