नाशिक : प्रदूषण कमी करून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच शासनाच्या ईलेक्ट्रीक वाहन धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रम अर्थात एन-कॅप अंतर्गत हाती घेतलेल्या २९ ई-चार्जिंग स्टेशनन्सचे काम अंतिम टप्प्यात असून नवीन वर्षाच्या सुरूवातीला जानेवारीत पहिल्या टप्प्यातील दहा ई-चार्जिंग स्टेशनची सुविधा नाशिककरांना उपलब्ध होणार आहे.
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. यासाठी तब्बल ८७ कोटींचा निधी शासनाने महापालिकेला दिला आहे. या निधीतून महापालिकेने यांत्रिकी झाडू, रस्त्यालगत ग्रीनरी, सायकल ट्रॅक, विद्युत दाहिनी असे उपक्रम राबविले आहेत. त्याचप्रमाणे शासनाच्या ईलेक्ट्रीक वाहन धोरणाला चालना देण्यासाठी ईलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्टेशन्स सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी सुरूवातीला दहा कोटी रुपये खर्चातून २० ठिकाणी ई-चार्जिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. २५ टक्के कमी दराने हे काम सर्वोटेक पॉवर सिस्टिम लिमिटेड या कंपनीने केल्यामुळे दहा कोटींच्या कामासाठी सात कोटी ४३ लाख रुपये खर्च झाले.
बचत झालेल्या दोन कोटी ५७ लाख रूपयांच्या निधीतून नऊ नवीन चार्जिंग स्टेशनच्या उभारणीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यासाठी शासनाची मंजुरी घेतली जात आहे. दरम्यान मूळ प्रस्तावानुसार २० पैकी १५ ई-चार्जिंग स्टेशनची स्थापत्यविषयक कामे पूर्ण झाली असून दहा ठिकाणी महावितरणच्या जोडणीची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. त्यामुळे या दहा चार्जिंग स्टेशनची सेवा नवीन वर्षात जानेवारी महिन्यापासून सुरू केली जाणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात मुख्यालय राजीव गांधी भवन, पश्चिम विभागीय कार्यालय, पूर्व विभागीय कार्यालय, नाशिकरोड विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय, सिडको विभागीय कार्यालय, तपोवन बस डेपो, अमरधाम फायर स्टेशन पंचवटी, सातपूर फायर स्टेशन, राजे संभाजी स्टेडीअम सिडको, बिटको हॉस्पीटल, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, बी. डी. भालेकर मैदान, प्रमोद महाजन उद्यान, महात्मा नगर क्रिकेट मैदान, दादासाहेब फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी बाजार इमारत, लेखानगर मनपा जागा, अंबड लिंकरोडवरील मनपा मैदान या २० ठिकाणी चार्जिंग स्टेशन्सची उभारणी अंतिम टप्प्यात आहे.
ई-चार्जिंग स्टेशन्सकरीता दर निश्चित करावे लागणार आहेत. यासाठी महापालिकेने राज्यातील अन्य महापालिका तसेच खासगी ई-चार्जिंग स्टेशन्सचे दर मागविले आहेत. दर निश्चितीचा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.