नाशिक : जिल्ह्यातील 2,608 रेशन दुकानांपैकी 2,558 दुकानांना नेटवर्क समस्या भेडसावत आहे, तर 50 दुकानांना अधूनमधून नेटवर्क मिळते. परिणामी, ई - केवायसीची प्रक्रिया प्रभावित झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी तलाठ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या निर्देशानुसार लाभार्थींना रेशन देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील १५ तालुक्यांसह नाशिक आणि मालेगाव शहर अशा १७ विभागांमध्ये ई-पॉज मशिनद्वारे रेशनचे वाटप करण्यात येते. ग्रामीण किंवा दुर्गम भागात इंटरनेट सुविधेचा अभाव आहे. कनेक्टिव्हीटीची कमतरता यामुळे ई-पॉज मशिनद्वारे ओटीपी येत नसल्याने रेशन मिळण्यात अडथळा निर्माण होतो. शिवाय, बायोमेट्रीक प्रमाणिकरण करण्यात अडचणी येतात. यातून लाभार्थी धान्यापासून वंचित राहत असल्याच्या तक्रारी जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त होत होत्या. यावर उपाय म्हणून पुरवठा विभागाने गावातील तलाठी यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली असून त्यांच्या निर्देशाप्रमाणे धान्याचे वाटप करण्याच्या सूचना आहेत.
कोणत्याही दूरसंचार कंपनीचे नेटवर्क नसलेली नाशिकमध्ये एकूण 385 दुकाने आहेत. त्याखालोखाल मालेगाव (324), सुरगाणा (153), बागलाण (184) या तालुक्यातील लाभार्थींना रेशन मिळण्यास अडचणी येत आहेत. रेशन वाटप समस्येवर मात करण्यासाठी शासनाने प्रत्येक गावात नोडल अधिकार्याची नेमणूक केली आहे. साधारणत: गावातील तलाठी यांनाच नोडल अधिकार्याचा दर्जा दिला आहे. त्यांच्या निर्देशांनुसार ईकेवायसी नसलेल्या लाभार्थींना रेशन देण्यात येत आहे.