नाशिक : मेट्रो निओचा प्रस्ताव गुंडाळल्यानंतर आता नियमित मेट्रोसाठी महामेट्रोने पावलं उचलली असून त्यासाठी नाशिक शहराचा सर्वंकष वाहतुक आराखडा तयार करण्याचे निर्देश नाशिक महापालिकेला देण्यात आले आहेत. येत्या दीड महिन्यात हा आराखडा महामेट्रोला सादर केला जाणार असून मेट्रोसह सिंहस्थ वाहतुक नियोजनासाठी या आराखड्याचा वापर केला जाणार आहे.
वाढत्या नागरिकीकरणाबरोबर शहरातील वाहतुकीचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पार्कींग, ध्वनि-वायु प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतुक व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने सर्व महापालिकांनां स्वतंत्रपणे वाहतुक आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिक महापालिकेने यापूर्वी २०१६ मध्ये वाहतुक आराखडा तयार केला होता. त्यावेळी २०३६च्या लोकसंख्येचा विचार करून आराखड्याचे नियोजन करण्यात आले होते. सार्वजनिक परिवहन व्यवस्था सक्षमीकरणावर भर देण्याबरोबरच सार्वजनिक वाहतूक धोरण, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, रस्ता विकास, मालवाहतूक, तंत्रज्ञान व रहदारी अभियांत्रिकी धोरणाचा समावेश होता. अर्बन मास ट्रान्झिट या दिल्ली (युएमटीसी) स्थित कंपनीने सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला होता. शहरात सिटीलिंकची बससेवा या आराखड्यातीलच शिफारस होती. त्या आराखड्याचाच आधार घेवून पुढे नाशिकच्या टायरबेस मेट्रो निओचा प्रस्ताव पुढे आला. नियमित मेट्रोसाठी तासाला २० हजार प्रवासी मिळणे अपेक्षित आहे. परंतू नाशिकमध्ये प्रतितास चौदा हजार प्रवासी मिळतं असल्याने टायरबेस मेट्रोचा पर्याय निवडण्यात आला होता. आता टायरबेस मेट्रो एवजी नियमित मेट्रोसाठी पावले उचलण्यात आली असून त्यासाठी महामेट्रोने नाशिकचा वाहतुक आराखडा तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यासाठी कोलकाता स्थित श्रेय कंपनीला काम देण्यात आले आहे.
महापालिका हद्दीत प्रवेश करताना पेठरोड, आडगाव, देवळाली नाका, गंगापूर गाव, चेहेडी गाव, विल्होळी, दिंडोरी रोड, त्र्यंबकरोड सह नऊ प्रमुख मार्गांवरील प्रवेशद्वारावर वाहनांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
शहरातील प्रमुख २५ चौकांमधील वाहतुकीचेही सर्वेक्षण केले जाईल.
वर्दळीची सार्वजनिक ठिकाणे.
महत्वाचे वीस सिग्नल.
वाहनांची गर्दी होत असलेली वर्दळीची ठिकाणे.
अस्तित्वातील अंदाचे लोकसंख्येच्या १.२ टक्के नागरिकांचा अभिप्राय.
शहरात अस्तित्वातील मालमत्तांपैकी एक टक्का मालमत्ताधारकांची भेट.
केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार नाशिक शहराचा सर्वंकष वाहतुक आराखडा तयार केला जात आहे. त्यासाठी वाहतुक सर्वेक्षणाला सुरूवात झाली आहे.रविंद्र बागुल, कार्यकारी अभियंता, महापालिका ट्रॅफीक सेल.