नाशिक

Nashik News | नाशिककरांचे जलसंकट गडद, गंगापूर धरण समूहामध्ये अवघा इतका साठा

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ४० अंशांवर विक्रमी तापमानाकडे पारा वाटचाल करीत असतानाच दुसरीकडे पाणीटंचाईचा आलेखही उंचावला आहे. शहरवासीयांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची पाणीपातळी अत्यंत खालावली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार गंगापूर धरण समूहामध्ये अवघा २२.९ टक्केच जलसाठा उरला असून, येत्या आठ दिवसांत तो आणखी खाली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शहरवासीयांचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे.

गंगापूर धरणात सध्या अवघा २८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. आगामी पावसाळ्यापर्यंत याच पाण्यावर शहरवासीयांची तहान भागवावी लागणार असल्याने नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न आता अधिकच तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाणीकपातीची टांगती तलवार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ३४८ गावे आणि ८७२ वाड्या अशा एकूण एक हजार २२० गाव-वाड्यांना ३७० टँकरच्या ८१४ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यात १४ शासकीय आणि ३५६ खासगी टँकरचा समावेश आहे. तर टँकर भरण्यासाठी आतापर्यंत तब्बल २०१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात गावांसाठी ६१, तर टँकरसाठी १३४ विहिरींचा समावेश आहे. वाढत्या उन्हात गावोगावी पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नाशिक शहरात शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार असून, रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुरवठा वाहिन्यांची दुरुस्ती, व्हॉल्व्ह बदलणे, व्हॉल्व्हची दुरुस्ती कामे असल्याने पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

चर खोदण्यास आचारसंहितेचा फटका

गंगापूर धरणात खालावलेला पाणीसाठा उचलता यावा, यासाठी चर खोदण्याचा प्रस्ताव नाशिक महानगरपालिकेने पाठविला हाेता. तो शासनाने फेटाळला आहे. लोकसभेची आचारसंहिता ४ जूनला संपुष्टात येत असली तरी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने पुन्हा तीच अडचण येणार आहे. त्यामुळे याप्रश्नी तोडगा केव्हा लागेल, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

गंगापूर धरण समूहाची स्थिती (दलघफू मध्ये)

धरण- उपलब्ध जलसाठा- टक्केवारी

गंगापूर- १५८२-२८.१०

काश्यपी-४३६-२३.५४

गौतमी गोदावरी-२०७-११.०८

आळंदी-२१-२.५७

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT