आपल्या परिसरातील खड्ड्यांची माहिती PCRS App वर द्या. Pudhari News Network
नाशिक

Nashik News | नाशिककर नो टेंशन! आता 72 तासांच्या आत खड्डा बुजणार

PCRS App : पीसीआरएस अ‍ॅपद्वारे खड्ड्यांची माहिती; 98 टक्के खड्डे बुजविल्याचा बांधकाम विभागाचा दावा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक विभागात वर्षभरात जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील 98 टक्के खड्डे बुजविण्याचा दावा नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची माहिती त्वरीत मिळावी यासाठी बांधकाम विभागाने पीसीआरएस हे मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे.

अ‍ॅपवर माहितीनुसार 72 तासांच्या आत खड्डा बुजविण्यात येतो. मात्र नाशिक - त्र्यंबक रोड, नाशिक - दिंडोरी या खड्डेमय मार्गांकडे विभागाचे लक्ष वेधले असता निधीअभावी खड्डे बुजविण्याचे काम थांबले असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.

नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित नाशिक विभागातील 23 हजार किलोमीटरचे रस्ते येतात. त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील २२00 किलोमीटर, तर धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यातील ५२00 किलोमीटर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहे. या सर्व रस्त्यांची नियमितपणे देखभाल दुरुस्ती बांधकाम विभागाकडून करण्यात येते. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांना खड्डे पडतात, यामुळे वाहने चालवताना वाहनचालक बेजार होतात. गतवर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यासाठी मोठी मोहीम राबविली. मोहिमेवर वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष ठेवले. मोहिमेनंतर 98 टक्के खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा विभागाकडून करण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने 98 टक्के खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे.

पीसीआरएस अ‍ॅपवर द्या खड्ड्यांची माहिती

जिल्ह्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची माहिती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पीसीआरएस हे अ‍ॅप विकसित केले आहे. अ‍ॅपवर तक्रार दाखल झाल्यानंतर 72 तासांच्या आत खड्डे बुजविण्यात आल्याचे उत्तर अ‍ॅपद्वारे देण्यात आले. अ‍ॅपचा वापर सहजपणे करता येत असल्याने नागरिकांकडून तक्रारी दाखल करण्यात वाढ झाली आहे.

पीसीआरएस अ‍ॅपमुळे खड्ड्यांची माहिती त्वरीत उपलब्ध होते, यामुळे खड्डे बुजविणे सोपे झाले आहे. नागरिकांचा प्रवास सहज आणि सुलभ व्हावा यासाठी खड्डेमुक्त रस्ते तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. काही कारणास्तव जिल्ह्यातील मार्गांवर खड्डे असल्यास ते त्वरेने बुजविले जातील.
प्रशांत औटी, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT