Nashik News
आज शहराचा पाणीपुरवठा बंद File Photo
नाशिक

Nashik News | नाशिककरांनो पाणी जपून वापरा, आज शहराचा पाणीपुरवठा बंद

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मुकणे धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मिमी मुख्य जलवाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे, शनिवारी (दि. १३) शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच रविवारी (दि. १४) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे नाशिककरांना दोन दिवस पाणी जपून वापरावे लागणार आहे.

मुकणे धरण येथून पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मिमी मुख्य जलवाहिनी जोडणी, जलवाहिनीवरील गळती थांबविणे, मुख्य जलवाहिनीसह उपजलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच व्हॉल्व्हची दुरुस्ती यांसह गंगापूर धरण पंपिंग स्टेशन स्विच यार्ड चेंज ओव्हर स्ट्रक्चरचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे गंगापूर धरण पंपिंग स्टेशन व मुकणे पंपिंग स्टेशन येथील पाणी उपसा बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी, शनिवारी पाणीपुरवठा होणार नाही. तर रविवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

मान्सूनने फिरवली पाठ; अघोषित पाणीकपात

राज्यात मान्सून दाखल होत महून जास्त कालावधी झाला, तरी नाशिक जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. नाशिक जिल्ह्याच्या धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. अशात धरणांमध्ये ३१ जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणीकपातीची टांगती तलवार नाशिककरांवर आहे. धरणात पाणीसाठा कमी असल्याने शहराला आणखी २० दिवस कसेबसे पाणी पुरवले जाऊ शकते. त्यात पावसाने पाठ फिरवल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत आहे. अशात देखभाल, दुरुस्ती कामाच्या नावाखाली शहरात अघोषित पाणीकपात होत असल्याची चर्चा आहे.

SCROLL FOR NEXT