चांदवड : णमोकार तीर्थ क्षेत्रात फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या भव्य आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक महोत्सवाच्या पूर्वसंध्येला भक्ती, त्याग आणि श्रद्धेचा अद्भुत संगम पाहायला मिळाला. राष्ट्रसंत आचार्य कुंथुसागरजी महाराज यांचे शिष्य आचार्य गुणधर नंदिजी महाराज, आचार्य सूर्यसागरजी महाराज आणि उपाध्याय विभंजन सागरजी महाराज यांचे ससंघ णमोकार तीर्थावर मंगल आगमन झाले.
कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश तसेच वरुर येथून सुमारे एक हजार ते पंधराशे किलोमीटरची कठीण पदयात्रा पूर्ण करून हे मुनीसंघ सवाद्य आणि जयघोषात तीर्थक्षेत्री दाखल झाले. त्यांच्या आगमनाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
महाराजांचे आगमन होताच ‘गुरुदेव की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सौभाग्यवती महिलांनी मंगल कलश धारण करून गुरुदेवांचे स्वागत केले. वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मंदिर परिसरात प्रवेश करताच भाविकांनी पुष्पवृष्टी करत पादप्रक्षालन करून आशीर्वाद घेतले. या पार्श्वभूमीवर आयोजित ‘गुरु मिलन’ कार्यक्रमात आध्यात्मिक ऊर्जेचा प्रभावी संचार अनुभवायला मिळाला. या सोहळ्यात राष्ट्रसंत आचार्य देवनंदीजी महाराज, आचार्य सूर्यसागरजी महाराज, आचार्य पद्मनंदीजी महाराज, आचार्य विद्यानंदीजी महाराज, आचार्य कर्मविजयनंदीजी महाराज, आचार्य कुमुदनंदीजी महाराज तसेच युगल मुनि अमोघकीर्ति व अमरकीर्तिजी महाराज यांच्या प्रेरणादायी प्रवचनांनी भाविक मंत्रमुग्ध झाले. यावेळी १०० हून अधिक महाराज व माताजींचे पावन सानिध्य लाभले.
आचार्य संघाने आपल्या मंगल प्रवचनांतून आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक महोत्सव हा केवळ भव्य न राहता ऐतिहासिक ठरावा, असे आवाहन केले. पंचकल्याणकासारखी आयोजने आत्मकल्याण व धर्मप्रभावनेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. बालब्रह्मचारी वैशाली दीदी व प्रतिष्ठाचार्य अक्षय भैय्या यांनीही आपल्या भाषणांतून गुरुदेवांचे स्वागत व महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रसंगी महोत्सवाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष पेंढारी, उपाध्यक्ष महावीर गंगवाल, मांगीतुंगीजी ट्रस्टचे अध्यक्ष सुमेर काले, चांदवडचे भूषण कासलीवाल, विश्वस्त पवन पाटणी, अनिल जमगे, संतोष काला, विनोद शहा, प्रकाशचंद शेठी, चंद्रशेखर कासलीवाल तसेच प्रचार-प्रसार संयोजक विनोद पाटणी यांच्यासह हजारो श्रावक-श्राविका उपस्थित होते. आगामी काळात होणाऱ्या अभिषेक, पूजन व विविध धार्मिक विधींसाठी जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती समितीने दिली.