नाशिक : मतदानप्रक्रियेमध्ये गोंधळ उडाल्यानंतर सर्व पॅनलच्या नेत्यांनी निवडणूक केंद्राकडे धाव घेतली. त्यावेळी निवडणूक केंद्राबाहेर झालेली कार्यकत्यांची गर्दी. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Nashik News | नाईक शिक्षण सं‌स्था मतदानात राडा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीचे मतदान संस्थेच्या आवारात पार पडले. सकाळच्या सत्रात थोडाफार गोंधळ झाला. सायंकाळच्या सत्रात मतदान संपण्याच्या अखेरच्या १० मिनिटांत एका बुथवर बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांनी एका माजी आमदाराच्या पुत्रास मारहाण केल्याने गोंधळात आणखी भर पडली.

शनिवारी (दि. २७) सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात उमेदवारांचा मतदान करण्याकडे कल कमी असला तरी १० वाजेनंतर मात्र सभासद मतदारांची संख्या वाढली. आवारात असलेल्या दिंडोरी तालुका बुथवर पॅनलच्या उमेदवारांनी ठाण मांडून बसत मतदानाचे आवाहन करत होते. विरोधी पॅनलचे उमेदवारही प्रवेशद्वाराकडून बुथकडे रवाना झाले. यावेळी पोलिस आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत सर्व उमेदवारांना बाहेर काढले.

बोगस मतदानाच्या आरोपानंतर कार्यकर्त्यांमध्ये झालेली बाचाबाची.
सरचिटणीस पदाच्या मतपत्रिकांबाबत बोगस मतदान झाल्याचा आरोप एका पॅनलने केला आहे. याबाबत निवडणुकीमधील सर्व पॅनलप्रमुखांनी निवडणूक अधिकाऱ्यांना याची चौकशी करण्यास सांगितले आहे. काही उमेदवारांनी मतपत्रिकांचा गठ्ठा बोगस मतदानासाठी वापरल्याचा आरोप केला आहे. हा आरोप चुकीचा वाटतो. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कारवाई करावी.
ॲड. तानाजी जायभावे, उमेदवार, प्रगती पॅनल

दरम्यान, मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात फार्मसी महाविद्यालयामध्ये असलेल्या बुथ क्रमांक १४ मध्ये सरचिटणीस पदासाठी असलेल्या उमेदवाराचा नातलग बोगस मतपत्रिका टाकत असल्याची हरकत विरोधी पॅनलकडून घेण्यात आली. यामध्ये पोलिस वेळेवर पोहोचल्याने त्यांनी संबंधितापैकी एकास ताब्यात घेतले तर दुसरी व्यक्ती गायब झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर संबंधित बुथ क्रमांक १४ वर उमेदवार माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी कार्यकर्त्यांसह पोहोचत संबंधित बुथप्रमुखास जाब विचारला. त्यामुळे बराच वेळ कार्यकर्ते, पॅनलचे नेते, निवडणूक कर्मचारी यांच्यात गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे शीघ्रकृतीदल दाखल झाल्याने येथे छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.

निवडणुकीमध्ये गैरप्रकार घडला असल्याची तोंडी तक्रार उमेदवार बाळासाहेब सानप यांनी केली आहे. घडलेल्या गैरप्रकाराबाबत सर्व पॅनलच्या प्रमुखांचे तसेच बुथवरील कर्मचाऱ्यांचे व्हिडीओ स्टेटमेंट घेतलेले आहेत. आरोप करणाऱ्या पॅनलच्या प्रमुखांना लेखी तक्रार करण्यास सांगितली आहे. लेखी तक्रार आल्यास सीसीटीव्ही तपासून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई होईल. रविवार (दि.२८) रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे.
ॲड. जालिंदर ताडगे, अध्यक्ष, निवडणूक निर्णय मंडळ
नाशिक : मतदानासाठी महिलावर्गात असलेला उत्साह.
फार्मसी महाविद्यालयातील एका बुथवर परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या नातलगांनी सरचिटणीस पदासाठीच्या काही बोगस मतपत्रिका मतपेटीमध्ये टाकत असल्याची बाब पोलिंग एजंटच्या लक्षात आली. हे कृत्य करणाऱ्या दोघांपैकी एकास पोलिसांच्या हवाली केले आहे तर दुसरी व्यक्ती गायब झाली आहे. पोलिसांनी त्याला पकडून कारवाई करावी. त्यांनी सत्यता तपासून दोषींवर कारवाई करावी.
कोंडाजी आव्हाड, उमेदवार, परिवर्तन पॅनल
बोगस मतदान झाल्याच्या संशयानंतर बूथबाहेर झालेली कार्यकर्त्यांची गर्दी.
शैक्षणिक संस्थेत असा प्रकार होणे हे चुकीचे आहे. मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. मात्र, शेवटच्या काही मिनिटात बोगस मतदान झाल्याने संपूर्ण प्रक्रियेलाच गालबोट लागले. ते अपेक्षित नव्हते. मात्र, हा प्रकार झाल्यानंतर सर्वांनी संयमाची भूमिका घेणे गरजेचे होते. मात्र, तसे काही झाले नाही.
पंढरीनाथ थोरे, उमेदवार, क्रांतिवीर विकास पॅनलचे
ही सामाजिक शिक्षण संस्था आहे. साडेचार वाजेपर्यंत मतदान सुरळीत सुरू होते. मात्र, बनावट ब्लँक मतपत्रिका मतदान केंद्राबाहेर आणल्यानंतर संबंधितांना पाच हजार रुपये दिले जात होते. त्यामुळे हा गोंधळ झाला.
मनोज बुरकुले, उमेदवार, नवऊर्जा पॅनल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT