नाशिक

Nashik News | फायर ऑडिट केले नाही तर होणार महापालिकेची कारवाई; पाणी, वीजपुरवठा तोडणार

Nashik NMC News | 414 हॉटेल्स, 253 रुग्णालयांचा पाणी व वीजपुरवठा तोडणार; फायर ऑडिट न केल्याने महापालिकेची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : फायर ऑडिट न केल्याने शहरातील ४१४ हॉटेल्स तसेच २५३ खासगी रुग्णालयांचा पाणी व वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. यासंदर्भात महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सहाही विभागीय कार्यालये तसेच महावितरणाला पत्र पाठविले आहे. यामुळे फायर ऑडिट न करणाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.

हॉटेल्स, रुग्णालयांची फायर ऑडिटची स्थिती

  • शहरातील एकूण हॉटेल्स: ५४०

  • फायर ऑडिट केलेल्या हॉटेल्स : १२६

  • फायर ऑडिट नसलेल्या हॉटेल्स : ४१४

  • शहरातील एकूण खासगी रुग्णालये : ६३९

  • फायर ऑडिट केलेली रुग्णालये : ३८६

  • फायर ऑडिट नसलेली रुग्णालये : २५३

राज्यात २००८ पासून महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ व सुधारित अधिनियम २०२३ व नियम २००९ लागू करण्यात आले आहेत. या अधिनियमातील तरतुदीनुसार विविध स्वरूपाची कार्यालये, आस्थापना तसेच इमारतींच्या वापराच्या अनुषंगाने अग्निप्रतिबंधक उपाययोजना करणे तसेच संबंधित उपाययोजना दुरुस्त व कार्यक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र वर्षातून दोन वेळा सादर करणे बंधनकारक आहे. ही यंत्रणा सुस्थितीत आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी वर्षातून दोनदा फायर ऑडिटचे 'बी' प्रमाणपत्र मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे.

त्यानुसार, नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत शहरातील व्यावसायिक आस्थापना तसेच इमारतींशी संबंधित व्यवस्थापनांना जानेवारी महिन्यात फायर ऑडिट करून घेण्याबाबत जाहीर नोटीस बजावण्यात आली होती. त्यासाठी त्यांना मुदत देण्यात आली होती. मात्र, या मुदतीनंतरही अनेक आस्थापनांनी फायर ऑडिट करून घेतल्याचे वा यंत्रणा बसविल्याबाबतचे पत्र सादर केलेले नाही. त्यानुसार, अग्निशमन विभागाने शहरातील ४१४ हॉटेल्स आणि २५३ हॉस्पिटल्सचा वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यासाठी पावले उचलली असून, विभागीय कार्यालये तसेच महावितरणला पत्र देऊन यादी सादर केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT