नांदगाव : नांदगाववरून नायडोंगरीच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसला अपघात होऊन पाच जण जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि.२३) दुपारी ४.१० च्या सुमारास पिंपरखेड टोल नाक्याजवळ घडली. बसमध्ये केवळ तीनच प्रवासी असल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.
या अपघातात बसचालक केशव परदेशी, बसवाहक अनिल आहेर यांच्यासह शहादू अंबाजी मोरे (वय ७५), ताराबाई शहादू मोरे (वय ६८), खंडू कल्याण चव्हाण (वय ६२) हे तीन प्रवासी जखमी झाले.
याबाबत अधिक माहिती अशी, बस पिंपरखेड टोल नाक्याच्या पुढे आली असता, समोरून एक अनोळखी पिकअप अत्यंत भरधाव वेगाने बसच्या दिशेने आली. भरधाव पिकअपला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने बस डाव्या बाजूला घेतली. मात्र, वेगावर नियंत्रण न राहिल्याने बस थेट रस्त्याच्या खाली उतरली आणि हा अपघात झाला. अपघातानंतर ती अज्ञात पिकअप चालक घटनास्थळावरून वेगाने पसार झाला.