नाशिक : महाराष्ट्र विधिमंडळाच्या २०२४-२५ कार्यकाळासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ११ समित्यांची घोषणा झाल्यानंतर आता शासनाने उर्वरित समित्यांचीही घोषणा केली आहे. या नियुक्त्यांमध्ये जिल्ह्यातील आमदारांना संधी मिळाली आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या प्रमुखपदी नांदगावचे आमदार सुहास कांदे यांची निवड झाली असून, या माध्यमातून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीस बहुधा पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे.
अनुसूचित जमाती कल्याण समितीत इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांना सदस्यपद, महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीत देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांना सदस्यत्व, तर इतर मागासवर्गीय कल्याण समितीत 'नाशिक मध्य'च्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांची नियुक्ती झाली आहे.
पंचायतराज समितीवर कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांना सदस्यत्व मिळाले आहे, तर अंदाज समितीत बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, दिलीप बनकर आणि सरोज आहिरे यांना संधी देण्यात आली आहे. यासंदर्भात शासनाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.