नाशिक : इगतपुरी तालुक्यातील आडवण येथील भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांचा होत असलेला विरोध लक्षात घेता २ जूनपर्यंत भूसंपादन प्रक्रियेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ब्रेक दिला होता. तसेच सोमवारी (दि. २) याबाबतची बैठक घेणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले होते.
मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार (दि.1) व सोमवार (दि.2 ) असे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर असल्याने त्यांच्या दौऱ्यात अधिकारीवर्ग व्यस्त होता. त्यामुळे आता ही बैठक बुधवारी (दि. 4) नियोजित आहे.
औद्योगिक विकास महामंडळाकडून आडवण व पारदेवी येथे औद्योगिक भूसंपादन केले जात आहे. त्याला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असून, त्या विरोधात शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढला होता. सक्तीने भूसंपादन केल्यास आत्मदहनाचा इशारा दिला होता. अखेर शेतकऱ्यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधला. २८ मे रोजी मंत्रालयात सामंत यांच्या दालनात खासदार वाजे व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. त्यात सामंत यांनी भूसंपादनाला तूर्त स्थगिती दिली व सोमवारी (दि. २) पुन्हा बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी, इगतपुरीचे प्रांताधिकारी उपस्थित राहणार होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात अधिकारी व्यग्र असल्याने ही बैठक रद्द करण्यात आली. आता बुधवारी (दि. ४) बैठक होण्याची शक्यता आहे.
अधिकारी येऊ शकत नसल्याने उद्योगमंत्र्यांकडील बैठक बुधवारी नियोजित केली आहे. शेतकऱ्यांना तसा निरोप दिला आहे.राजाभाऊ वाजे, खासदार,नाशिक