नाशिक

Nashik News : दहिवडच्या ग्रामयात्रेवर दुःखाचे सावट; मांडव तोडताना झाडावरून पडून एकाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

देवळा : तालुक्यातील दहिवड येथे ग्रामदैवत दुर्गामाता यात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येला एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. यात्रेसाठी मंदिराचा मांडव तयार करण्याच्या तयारीत असताना, लिंबाच्या झाडावरून पडून श्रावण संपत देवरे (वय ५४) यांचा मृत्यू झाला. आनंदाच्या वातावरणात अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आज गुरुवार (दि. २) रोजी दहिवड येथे पारंपारिक ग्रामदैवत दुर्गामाता यात्रौत्सवाचा उत्साह होता. देवीच्या मंदिरावर टाकण्यात येणारा मांडव तोडण्याचे काम सुरू असताना श्रावण देवरे झाडावर चढले होते. मात्र, अचानक त्यांचा तोल गेल्याने ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या तोंडाला आणि छातीला गंभीर दुखापत झाली.

त्यांना तात्काळ देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच दहिवड गावातील ग्रामयात्रेच्या आनंदावर विरजण पडले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पोलीस तपास सुरू

या घटनेबाबत देवळा पोलीस ठाण्यात 'अकस्मात मृत्यू'ची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खुरासने आणि पोलीस हवालदार कामडी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मृत श्रावण देवरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. ते प्रगतशील शेतकरी महारू संपत देवरे यांचे बंधू, तर सामाजिक कार्यकर्ते महेंद्र संजय देवरे यांचे वडील होत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT