नाशिक : जिल्ह्यात कुटुंब नियोजन कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत 'पुरुष नसबंदी पंधरवडा' राबवण्यात येत आहे. या मोहिमेचे घोषवाक्य 'स्वस्थ व आनंदी कुटुंबाचे स्वप्न, पुरुषांच्या सहभागातूनच साकार' असे आहे.
कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढवणे, पुरुष नसबंदीचे प्रमाण वाढवणे, पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबाबत समाजात जनजागृती करणे, या उद्देशाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या मोहिमेत नागरिकांनी, विशेषतः पुरुषांनी सक्रिय सहभागी व्हावे. माहितीसाठी जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी केले आहे.
पहिला टप्पा - संपर्क आठवडा
२७ नोव्हेंबरपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे या कार्यक्रमासाठी योग्य जोडप्यांच्या याद्या तयार करत त्यांना पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचा अवलंब करण्यासाठी विनंती केली जाणार आहे. यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी 'नो स्कालपेल व्हॅसेक्टोमी' चा अवलंब केलेला आहे, त्यांच्यामार्फत या मोहिमेचा प्रचार व प्रसार करत माहिती देण्यात येणार आहे.
दुसरा टप्पा - सेवा आठवडा
२८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राकडील शस्त्रक्रिया गृहामध्ये 'स्टँडर्ड प्रोटोकॉल ऑफ स्टरिलायझेशन सर्व्हिसेस' चा अवलंब करत पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेची सेवा देण्यात येणार आहे. शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच आवश्यकतेप्रमाणे खासगी व सेवानिवृत्त सर्जन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या सनियंत्रणासाठी जिल्हा व तालुकास्तरावर विशेष पथके तैनात करण्यात आले आहे.