नाशिक : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत महात्मा फुले कलादालनाचे नूतनीकरण आणि अद्ययावतीकरण झाले. मात्र, त्यासाठी महापालिकेकडून केली जाणारी भाडे आकारणी आणि त्याचा भव्य आकार यामुळे कलाकारांकडून त्याचा वापरच केला जात नाही. त्यामुळे हे दालन बडा घर पाेकळ वासा या उक्तीप्रमाणे धूळखात पडून आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत महाकवी कलिदास कलामंदिराबरोबरच महात्मा फुले कलादालनाचेही नूतनीकरण, सुशोभीकरण करण्यात आले. मात्र, नूतनीकरणानंतर या दोन मजली भव्य वास्तूत किती शिल्प, चित्र कला प्रदर्शने भरली याचा आढावा घेतला, तर वास्तव अत्यंत खेदजनक आहे. यासाठी केली जाणारी भाडेआकारणी कलावंतांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे अनेक वर्षे प्रदर्शनच भरलेले नाही. २०१८ मध्ये राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या राज्यस्तरीय विद्यार्थी विभागातील कलाप्रदर्शनानंतर गेल्या ७ वर्षांत एकाही मोठे कलाप्रदर्शन येथे भरलेले नाही. दरम्यान, जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या राष्ट्रीय युवा सांस्कृतिक महोत्सवासाठी देभरातून आलेल्या युवा कलावंतांना राहण्यासाठी याचा वापर केला गेला. मात्र त्यामुळे कलादालनाच्या उभारणीमागील मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे.
शहराला निसर्गचित्रकार शिवाजी तुपे, चित्रमहर्षी वा. गो. कुलकर्णी यांच्यासारख्या मोठ्या चित्रकारांचा वारसा आहे. मात्र शहरात महापालिकेतर्फे चालवले जाणारे एकही छोटेखानी कलादालन नाही. दालनातील 'एसी' यंत्रणा तसेच दालनाबाहेरील दिवेही बंद आहेत. दालनाच्या वरील मजल्यावर स्मार्ट सिटीकडून नाशिकच्या महान व्यक्ती, वैभव दाखवणारे सिटिझन्स एक्स्पिरिअन्स सेंटर उभारण्यात येत आहे.
दुसरीकडे नाशिकसह जिल्ह्यातील कलाकारांना त्यांच्या चित्र, शिल्प यांसह अन्य कलाकृतींसाठी मध्यम किंवा लघु आकाराचे कलादालन उपलब्ध नाही. कलादालनासाठी भाडे कमी करावे, त्याचे चार छोटेखानी विभाग करून ते कलाकारांना माफक भाडेदर आकारणी करून उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नाशिकच्या कलाकारांनी केली आहे.
कलादालन उद्घाटनावेळी पायऱ्यांशेजारी केलेली शोभीवंत कुंड्यांची हिरवाई जळून गेली आहे. दालन परिसरातील दिवे बंद आहेत. प्रकाशयोजना नाही. त्यामुळे कलावंतांना प्रदर्शन भरवण्यासाठी खासगी कलादालनाचा पर्याय निवडावा लागत आहे.
शहराला भव्य दालनाची गरजच नाही. महात्मा फुले कलादालनातील तळमजल्यावरील हॉलमध्ये पार्टिशन टाकून चार भाग करावे. त्यावर व्यावसायिक आर्ट गॅलरीत असते. त्याप्रमाणे 'स्पॉटलाइट' प्रकाशयोजनेची सोय करावी. माफक भाडेदरामुळे नवोदितांसह सर्वांनाच तेथे कलाप्रदर्शनी भरवता येईल.संजय साबळे, प्राचार्य, नाशिक कलानिकेतन